हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे आणि साधनेचे प्रयत्न वाढवणे, हीच खरी दिवाळी ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दिवाळीनिमित्त कर्नाटक राज्यातील जिज्ञासूंसाठी विशेष सत्संगाचे आयोजन !

मंगळुरू – उत्साह आणि आनंद देणारा हा सण दिवाळी केवळ भौतिकदृष्ट्या साजरा न करता त्याची ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी समजून घेऊन शास्त्रानुसार साजरा करा. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय ! त्यासाठी आपण सर्व जणांनी देशात फोफावलेला अधर्म, अन्याय, धर्मविरोधी कृत्ये, धर्महानी करणार्‍या घटना यांविरुद्ध धर्मशक्तीच्या आधारावर लढा देऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच खरी दिवाळी आहे, असे उद्गार सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा काढले. दिवाळीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी समस्त हिंदू बांधवांसाठी एका विशेष ऑनलाईन सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगातील जिज्ञासूंना संबोधित करतांना पू. रमानंद गौडा बोलत होते. या सत्संगाचा उद्देश ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. काशीनाथ प्रभु यांनी स्पष्ट केला. कर्नाटक राज्यातील अनुमाने ५ सहस्र ७०० जिज्ञासूंनी सत्संगाचा लाभ घेतला.

भीषण आपत्काळात स्वतःचे रक्षण होण्यासाठी साधना करणे, हाच उपाय ! – पू. रमानंद गौडा

पू. रमानंद गौडा

आज बहुतेक हिंदू धर्माचरण आणि साधना करत नसल्याने त्यांचे जीवन आत्मकेंद्री झाले आहे. त्याच्या परिणामस्वरूप वातावरणात रज-तमाचा प्रभाव वाढून सत्त्वगुण न्यून झाला आहे. या असमतोलाने कोरोना महामारीसारखी रोगराई, निसर्गाचा प्रकोप, एवढेच नव्हे, तर मानव-निर्मित दंगे वाढून आपत्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काळात याची तीव्रता आणखी वाढून तिसरे महायुद्ध चालू होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे यापूर्वी देखील अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. अशा भीषण आपत्काळात स्वतःचे रक्षण होण्यासाठी साधना करणे, हा एकमेव उपाय आहे. त्याच प्रमाणे मनुष्यजन्माचा उद्देशही मोक्षप्राप्ती करणे, हाच आहे. ते परमोच्च ध्येय गाठण्यासाठी आपण साधना करायची आहे.

क्षणचित्रे

१. ‘धर्मांध जिहाद्यांनी ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र चालवले आहे. याविषयी सर्व हिंदूंनी जागृत होऊन ही दिवाळी ‘हलालमुक्त दिवाळी’ म्हणून साजरी करूया’, असे आवाहन पू. रमानंद गौडा यांनी केले. त्या वेळी एका घंट्यात ४५३ लोकांनी त्यांचे त्याविषयीचे मत व्यक्त केले. त्यातील ९६ टक्के हिंदूंनी ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करण्यास सहमती दर्शवली.

२. ‘धर्माचरण न केल्याने आज आपत्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे संतांच्या मार्गदर्शनातून लक्षात आले’, असा अभिप्राय एका धर्मप्रेमीने व्यक्त केला.