राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय संस्कृतीचा अक्षय्यवृक्ष आहे ! – पंतप्रधान मोदी

डॉ. हेडगेवार यांच्या स्मारकाला अभिवादन करतांना पंतप्रधान

नागपूर – परकीय आक्रमणानंतर स्वामी विवेकानंद यांनी युवकांना जागृत करत त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना निर्माण केली. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने जोर धरला असतांना अशा काळातच डॉ. केशव हेडगेवार यांनी देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांनी १०० वर्षांआधी लावलेले बीज आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिद्धांत आणि आदर्श यांनी आमच्या देशातील मूळ भावनेला बळ देण्याचे कार्य केले. संघ केवळ एक वटवृक्षच नाही, तर भारतीय संस्कृतीचा अक्षय्यवृक्ष आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते ३० मार्च या दिवशी नागपूर दौर्‍यावर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील ‘माधव नेत्रालया’च्या विस्तारित इमारतीचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केलेल्या मार्गदर्शनात ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,

१. भारतावर शेकडो वर्षे परकीय आक्रमण झाले. अनेक क्रूर आक्रमकांनी आपल्या देशाच्या संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीयत्वाची मूळ जाणीव कधीच कुणी संपवू शकला नाही.

२. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि त्याची ज्वाला तेवत ठेवण्यासाठी देशात अनेक चळवळींनी काम केले. त्यात भक्ती आंदोलनाचा मोठा वाटा आहे.

३. भारतातील अनेक थोर संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांची भावना कायम जिवंत ठेवण्याचे काम केले. समाजामध्ये असलेली दुरी संपवून सर्वांना एका सूत्रामध्ये बांधण्याचे काम भक्ती आंदोलनाने केले.

४. संघ १०० वर्षांपासून राष्ट्रीय जाणीव प्रबळ करण्याचे काम करत आहे. आपले शरीर हे परोपकारासाठी आहे. सेवा संस्कारात आली की, ती साधना बनते. संघाच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्या सेवाकार्यातून संस्था उभ्या केल्या आहेत.(शेष (चौकटीत)

पंतप्रधानांची संघ स्मृती मंदिराला भेट !

पंतप्रधानांनी रेशीमबाग येथील संघ स्मृती मंदिराला प्रथमच भेट दिली. या वेळी त्यांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. स्मृती मंदिरात त्यांच्या स्वागतासाठी स्वतः प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

या वेळी पंतप्रधान म्हणाले, ‘‘हेडगेवारजी आणि पूज्य गुरुजी यांना कोटी कोटी प्रणाम ! त्यांच्या स्मृतींना जपणार्‍या या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटन क्षमता यांच्या मूल्यांना समर्पित ही जागा राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. संघाच्या या २ महान स्तंभांची आठवण करून देणारी ही जागा देशसेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे. आपल्या प्रयत्नांमुळे भारतमातेचे वैभव सदैव वृद्धींगत होवो !’’

दीक्षाभूमीला भेट !

पंतप्रधानांनी दीक्षाभूमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला त्यांनी नमन केले. येथील दीक्षाभूमीला दोनदा भेट देणारे आतापर्यंतचे ते पहिलेच पंतप्रधान आहेत.

क्षणचित्रे

१. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पंतप्रधान प्रथमच नागपूर येथे येत असल्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

२. भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी लावलेल्या कापडी फलकावर ‘एक हैं तो सेफ हैं ।’ (संघटित असलो, तर सुरक्षित आहोत) असे लिहिले होते.

३. भाजपकडून शहरातील विविध चौक सजवण्यात आले. ४७ चौकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले.