गोव्यात गोमांसाची तस्करी चालूच !

मडगाव रेल्वेस्थानकावर ३०० किलो गोमांस कह्यात

मडगाव, ३० मार्च (वार्ता.) – येथील कोकण रेल्वे पोलिसांनी ३० मार्च या दिवशी सुमारे ३०० किलो अवैध गोमांस आणि मासळी भरलेले १० खोके कह्यात घेतले आहेत. अवैध गोमांस पुरवठादारांनी गोमांसामध्ये मासे मिसळल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. वास्को रेल्वेस्थानकावर २९ मार्च या दिवशी अशाच प्रकारे गोमांसाची तस्करी उघडकीस आली होती. राज्यात गोमासांच्या तस्करीमध्ये वाढ होत आहे. बजरंग दलाचे मडगाव विभागाचे प्रमुख भगवान रेडकर म्हणाले, ‘‘राज्यात गोवा मांस प्रकल्प असतांना गोमांसाची तस्करी का केली जाते ?’’

मोले तपासणीनाक्यावर ‘केसरिया हिंदू वाहिनी’ने पकडले ७ टन गोमांस

फोंडा – ‘केसरिया हिंदू वाहिनी’च्या गोवंश संरक्षण कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा आणि त्यांच्या पथकाने २९ मार्च या दिवशी मध्यरात्री मोले तपासणीनाक्यावर उत्तरप्रदेश नोंदणीकृत कंटेनर रोखला. यामध्ये सुमारे ७ टन गोमांस भरलेले होते. अध्यक्ष राजीव झा यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी यामध्ये गोमांस असल्याचे मान्य केले असून गोमांस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवणार असल्याचे सांगितले आहे.