
- सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी आयोजित केले होम !
- वाराहीदेवीच्या पीठाचे गुरुजी श्री गणपति सुब्रह्मण्य स्वामी यांनी केला होम !
- होमाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी होमाच्या वेळी देवतांना केलेली प्रार्थना !
या होमाच्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘सर्वत्रच्या साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होऊन हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होऊ दे, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आयुरारोग्य लाभू दे आणि येणार्या आपत्काळामध्ये सर्व साधकांचे रक्षण होऊ दे’, अशी प्रार्थना केली.

चेन्नई (तमिळनाडू) – २९ मार्च २०२५ या दिवशी शनि ग्रहाने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला. जेव्हा शनि ग्रह एका राशीतून दुसर्या राशीत जातो, या घटनेला ‘शनिगोचर’ असे म्हणतात. शनिगोचरामुळे ग्रहमंडलात होणारे पालट आणि त्यामुळे मानवावर होणारे चांगले-वाईट परिणाम यांविषयी अनेक ज्योतिष अभ्यासकांनी उल्लेख केला आहे. अशा या संधीकाळात साधना करणे आवश्यक आहे, असे अनेक संत आणि सद्गुरु यांनी सांगितले आहे. सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक, ‘अखिल विश्व ज्योतिष परिषदे’चे अध्यक्ष आणि ‘होरामार्तंड’ असलेले
पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी नाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे शनिदेव आणि वाराहीदेवी होम २९ मार्च या दिवशी आयोजित केला होता. चेन्नई शहराच्या अरुंबाक्कम येथील ऐश्वर्या हॉलमध्ये पार पडलेल्या या होमाला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही उपस्थित होत्या. चेन्नई येथील वाराहीदेवीच्या पीठाचे गुरुजी श्री गणपति सुब्रह्मण्य स्वामी यांनी हा होम केला. या होमाला ‘तमिळ फिल्म इंडस्ट्री’चे संगीत दिग्दर्शक श्री. शंकर गणेशन् आणि त्यांची पत्नी सौ. जीववर्षिणी यांचीही उपस्थिती लाभली.
या वेळी ‘अखिल विश्व ज्योतिष परिषदे’चे सचिव कन्नियर राजशेखर आणि अन्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यासह तमिळनाडू राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले अनेक ज्योतिषी आणि अभ्यासक उपस्थित होते. या होमानंतर एक ज्योतिष परिषदही पार पडली, ज्यामध्ये शनि ग्रह, शनिगोचर, भारताची ग्रहगती आणि भविष्य यांविषयी चर्चा करण्यात आली.
‘शनिगोचरा’च्या निमित्ताने सप्तर्षींनी दिलेला संदेश
२९ मार्च २०२५ हा दिवस हिंदु राष्ट्र स्थापनेच्या इतिहासात एक महत्त्वाचा दिवस आहे. शनि ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर देश-विदेश, मानव-देवता, धर्म-अधर्म, राजकारण, अर्थव्यवस्था, पृथ्वी-आकाश अशा अनेक स्तरांवर कधी न घडलेले पालट होणार आहेत. या दिवशी अमावास्याही आहे. पृथ्वीवर काही ठिकाणी सूर्यग्रहणाचा प्रभाव असेल. थोडक्यात मानवी आयुष्यातील एक ‘आध्यात्मिक संधीकाल’ असे म्हणता येईल.
या संधीकालाला तोंड देण्यासाठी आणि संरक्षणासाठी सनातनच्या सर्वत्रच्या साधकांनी २९ मार्च या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत ७ वेळा हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करावे. सर्व आश्रम, सेवाकेंद्र यांमध्येही सामूहिक पठण करावे. हनुमंत हा शनिपीडा दूर करणारा देव आहे.
– सप्तर्षी (१८.३.२०२५)
(सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे सनातनच्या सर्वत्रच्या साधकांनी ७ वेळा हनुमान चालिसाचे सामूहिक पठण केले. – संकलक)

सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित करण्यात आला कार्यक्रम
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देशभरात २३ सहस्रांहून अधिक भाविकांकडून ‘सामूहिक हनुमान चालिसा पठण’ !
२९ मार्च या दिवशी शनिगोचर अर्थात् श्री शनिदेवाने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. या शनिगोचरचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होण्यासाठी देशभरात श्रीराम आणि हनुमान यांच्या मंदिरांसह विविध मंदिरांमध्ये सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. हनुमान चालिसा पठणाच्या वेळी हनुमंत आणि शनिदेव यांच्या चरणी ‘हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना व्हावी’, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या उपक्रमात २३ सहस्रांहून अधिक भाविक, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. यात समविचारी संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योजक, विचारवंत आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळीही सहभागी झाली होती. या वेळी अनेकांनी आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला, तसेच ‘राष्ट्र आणि धर्म कार्य करण्यासाठी अशा उपक्रमांतून ऊर्जा मिळाली’, असे मनोगत अनेक भाविकांनी व्यक्त केले.