माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी !
मुंबई – केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांचा समावेश केंद्र सरकारच्या ‘तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन योजना’ म्हणजेच ‘प्रसाद’ योजनेत करावा, अशी मागणी शिवेसेनेचे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याविषयीचे लेखी निवेदन शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना सादर केले आहे.
राहुल शेवाळे यांनी पत्रात म्हटले आहे की,
१. मोरगाव येथील मोरेश्वर, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक, पाली येथील बल्लाळेश्वर, महड येथील वरदविनायक, थेऊर येथील चिंतामणी, लेण्याद्री येथील गिरिजात्मज, ओझर येथील विघ्नेश्वर आणि रांजणगाव येथील महागणपति ही मंदिरे अष्टविनायक म्हणून ओळखली जातात.
२. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी ही अष्टविनायक मंदिरे आपला संस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा आहेत.
३. या मंदिरांचा समावेश प्रसाद योजनेत झाल्यास देशभरातील इतर महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांमध्ये अष्टविनायक मंदिरे जोडली जातील. येथील पायाभूत सुविधांचा विकास होऊन भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकतील. तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल.