परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेले अमर्याद ऊर्जास्रोत असलेले आणि साधकांना शक्ती अन् चैतन्य प्रदान करणारे सनातनचे आश्रम !

‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) निर्मिलेले देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम, तसेच सनातनचे अन्य आश्रम’, यांविषयी साधकाला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम

१. साधकांमध्ये असलेला उत्साह आणि आनंद पाहून आश्चर्य वाटणे

‘माझ्या मनात विचार येतात, ‘सकाळी देवद आश्रमाच्या शेजारी असलेल्या संकुलातील निवासस्थानातून साधक (तरुण आणि वयस्कर) आश्रमात आल्यावर ते उत्साही आणि आनंदी असतात. हे साधक रात्री निवासस्थानी जातांनाही उत्साही आणि आनंदी असतात.’ त्यांना पाहून मला आश्चर्य वाटते.

श्री. अजय प्रजापती

२. समाजातील व्यक्तींचा सनातनच्या आश्रमाप्रती असलेला भाव

देवद आश्रमाच्या शेजारी असलेल्या संकुलात अन्य लोकही रहातात. त्यांच्यापैकी काही जण सकाळी चालण्याचा व्यायाम करतात. ते आश्रमाच्या समोरून जातांना आश्रमाला नमस्कार करतात आणि पुढे जातात. ते पाहून मला ‘आपणही एखाद्या मंदिरासमोरून जात असतांना मंदिराकडे पाहून नमस्कार करतो’, त्याची आठवण होते.

३. साधकांना शक्ती आणि चैतन्य प्रदान करणारे गुरुदेवांनी निर्मिलेले आश्रम

‘आश्रम आणि साधक यांचे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण व्हावे आणि आश्रमाभोवती संरक्षककवच रहावे’, यासाठी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर विविध देवतांची चित्रे आणि यंत्रे लावली आहेत. ते पाहून वाटते, ‘प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आश्रम आम्हा साधकांच्या कल्याणासाठी निर्माण केले आहेत. सनातनचे आश्रम अमर्याद ऊर्जास्रोत आहेत. आश्रमातील वातावरणामुळे साधकांना कळत नकळत सतत शक्ती आणि चैतन्य यांचा लाभ होतो अन् त्यांचे आध्यात्मिक स्तरावर रक्षण होते.

४. आश्रमातील चैतन्याच्या बळावर वयस्कर साधकही आश्रमात सेवारत असणे

आश्रमात ६० ते ८० वर्षांचे साधक सेवेसाठी वेळेवर येतात. ते प्रत्येक दिवशी सेवा चिकाटीने, पूर्ण क्षमतेचा वापर करून आणि श्रद्धेने करतात. हे सर्व प.पू. डॉक्टरांनी निर्माण केलेल्या ऊर्जा स्रोतामुळेच आहे. हे सहजतेने आपल्या लक्षातही येत नाही.

५. मला वाटले, ‘परम दयाळू आणि परम कृपाळू गुरुदेवांनी असे अन्य स्रोत साधकांच्या अन् जगताच्या कल्याणासाठी निर्माण केले असतील, जे आपल्याला ज्ञातही नसतील, ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही.’

ही सर्व सूत्रे श्री गुरूंनी शिकवली आणि त्यांनीच लिहून घेतली. त्याबद्दल मी परम दयाळू आणि परम कृपाळू गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अजय प्रजापती (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.१०.२०२४)