रिक्शाचालकांना त्रास देणार्‍या पोलीस हवालदारावर कारवाई करा !

अजिंक्य स्वयंचलित रिक्शा संघटनेची मागणी

सातारा, ३० मार्च (वार्ता.) – येथील एका पोलीस हवालदाराकडून रिक्शाचालकांना विनाकारण त्रास दिला जात आहे. त्या हवालदाराची चौकशी करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अजिंक्य स्वयंचलित रिक्शा, टॅक्सी संघटनेच्या वतीने पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, एक हवालदार रिक्शाचालकांना विनाकारण त्रास देतात. त्यांना जाब विचारणार्‍या रिक्शाचालकांना ते वाहन परिवहन अधीक्षक कार्यालयामध्ये जमा करण्याची दमदाटी करतात. एखाद्या प्रवाशाने हवालदार आणि रिक्शाचालक यांच्यामध्ये मध्यस्थी केल्यास त्यालाही ‘शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करू’, अशी दटावणी करतात. त्यामुळे या हवालदाराची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच सातारा मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर नंबर तोडण्याचे अनेक प्रकार घडतात.

संपादकीय भूमिका

पोलीस हवालदारांवर कुणाचा वचक नसल्याचे उदाहरण ! अशी मागणी रिक्शा संघटनेला करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !