२ वर्षांपासून नजरकैदेत ठेवलेल्या युवतीची सुटका

  • देवगड एस्.टी. स्थानकातील वाहकाने युवतीला फूस लावून पळवले होते !

  • भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी केली सुटका !

देवगड – येथील एस्.टी. स्थानकातील एका विवाहित वाहकाने देवगड तालुक्यातील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. त्यानंतर तिला २ वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. याची माहिती मिळाल्यावर भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी तिची सुटका करून तिला सोडवून तिच्या आई-वडिलांकडे सोपवले.

या प्रकरणात वाहकाची पहिली पत्नीही सहभागी होती. युवतीला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुटकेसाठी तिने अनेक प्रयत्न केले; मात्र वाहक आणि त्याची पत्नी यांच्या दबावामुळे ती अयशस्वी ठरली. पीडित युवती देवगड येथे नजरकैदेत असल्याची माहिती तिच्या बहिणीला मिळाली. त्यानंतर तिने भाजपच्या नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर यांना याची माहिती दिली. नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ. प्रियांका साळस्कर, भाजपच्या देवगड मंडळ अध्यक्ष सौ. उषःकला केळुसकर, भाजपच्या देवगड-जामसंडे महिला शहर अध्यक्ष सौ. तन्वी शिंदे, पीडित मुलीचे आई-वडील आणि तिची बहीण यांनी मिळून संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवली. त्यानंतर पीडित मुलीला सोडवून देवगड पोलीस ठाण्यात उपस्थित करण्यात आले.

‘संबंधित वाहकाची तातडीने देवगड एस्.टी. स्थानकातून जिल्ह्याबाहेर स्थानांतर करण्यात यावे’, अशी मागणी देवगडमधील ग्रामस्थांकडून होत आहे.