
नवी मुंबई – हिंदु नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थांनी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात नववर्ष स्वागत शोभायात्रा काढल्या होत्या. वाशी येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समिती, वाशी यांच्या वतीने स्वामीनारायण गुरुकुल सेक्टर -२९ येथून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रा मिरवणुकीत विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी धर्माचार्य ह.भ.प. डॉ. नीलेश महाराज शास्त्री, खंडेराव महाराज भोईर, कृष्णा भोईर, रामनाथ म्हात्रे, महेश कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या भक्त सेवा मंडळाच्या वतीने करावे गाव येथे हिंदु नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली. या वेळी वारकरी संप्रदाय यासह सामाजिक आणि धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, भाविक उपस्थित होते.
विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने तुर्भेगाव येथे श्री रामतनु माता मंदिर येथे सकाळी गुढी उभारून पंचक्रोशीत शोभायात्रा काढण्यात आली. दुपारी रामरक्षेची सहस्रावर्तने करण्यात आली.
नेरूळ येथे नववर्ष शोभा यात्रा समितीच्या वतीने सेक्टर ८ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथून शोभायात्रा काढण्यात आली होती. श्री स्वामी समर्थ मठ सेक्टर १८ येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. त्यानंतर महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. शाहबाज फणसपाडा युवा ग्रामस्थ उत्सव समितीच्या वतीने शाहबाज फणसपाडा गाव येथे हिंदु नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली होती. ऐरोली येथील सेक्टर १० सिद्धिविनायक मंदिरापासून स्वागत यात्रा चालू झाली. ग्रंथदिंडी, ज्ञान ज्योत, मर्दानी खेळ पथक, ध्वजपथक, लेझीम पथक, विविध पारंपारिक वेशभूषा पथक स्वागत यात्रेत होते. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि त्या संबंधीचा देखावा, पारंपरिक वेशभूषा पथक, संस्कृती पथक या यात्रेत होते.