|

पुणे – वक्फ मालमत्तांची अवैध विक्री आणि करचुकवेगिरी करत पुण्यात कोट्यवधी रुपये किमतीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वर्ष २०१६ मधील सरकारी आदेशानुसार इनाम भूमी देवस्थान (वक्फ) मालमत्ता म्हणून नोंदवण्याचे निर्देश होते, जेणेकरून त्यांची अवैध विक्री रोखता येईल; मात्र जिल्हाधिकारी, वक्फ बोर्डाचे अधिकारी आणि सदस्य यांनी हा आदेश धाब्यावर बसवून हा मोठा अपव्यवहार चालू ठेवला. वक्फ बोर्डाचे अधिकारी, सदस्य आणि गुन्हेगारी टोळीच्या संगनमताने हा घोटाळा झाला असून या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि आयकर विभाग यांच्यावतीने तातडीने चौकशी करावी. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमीन नूरमहंमद शेख, वक्फ बोर्ड सदस्य, प्रशासकीय अधिकारी आणि गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखांना त्वरित अटक करावी. लुटलेला पैसा परत मिळवून तो मुसलमान समाजाच्या शाळा, रुग्णालये आणि विद्यापीठ यांसाठी वापरण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि ‘महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्स’चे अध्यक्ष सलीम मुल्ला यांनी २९ मार्चला पत्रकार परिषदेत केली. (या घोटाळ्याची प्रशासनाने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, ही अपेक्षा ! – संपादक)
सलीम मुल्ला यांनी उघड केलेले गंभीर वास्तव
१. गरीब आणि गरजू व्यक्तींच्या नावाने बनावट ट्रस्ट सिद्ध करून अवैध व्यवहार लपवले गेले आहेत. उच्च-मूल्य असलेल्या वक्फ भूमी ‘रिअल इस्टेट’ (स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय) व्यावसायिकांना बनावट करारांद्वारे विकली गेली आहे. ट्रस्टच्या खात्यांद्वारे ‘मनी लाँडरिंग’ (गुन्हेगारी कारवायांतून मिळवलेला पैसा कायदेशीरित्या रूपांतर करण्याची प्रक्रिया) झाले असून, तो पैसा वैध मालमत्तांमध्ये गुंतवून सरकारी अन्वेषण यंत्रणांना चकवले आहे.
२. वक्फ बोर्डातील काही अधिकार्यांनी या गैरव्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावली असून गरिबांच्या हक्काच्या भूमी बळकावण्यास साहाय्य केले आहे. पुण्यातील वक्फ बोर्ड सदस्याने स्वत:च्या नातेवाइकांना बोर्डमध्ये नेमून निर्णयांमध्ये हेराफेरी केल्याचे उघड झाले आहे.
३. घोटाळ्यात अनेक प्रमुख धार्मिक आणि समाजकल्याणासाठी राखीव भूमी अवैधरित्या विकल्या गेल्या आहेत. त्यामध्ये बाणेर मशीद, उदन शाह वली दर्गा, आदम शाह वली दर्गा, छोटा शेख सल्ला दर्गा, बडा शेख सल्ला दर्गा, हजरत अब्बास का आलम (पंजा), या मालमत्तांचा समावेश आहे.
बनावट ट्रस्टद्वारे वक्फच्या भूमी हडपल्या !अमीन नूरमहंमद शेख, त्याचा सावत्र मुलगा असीम अमीन शेख आणि त्यांचे सहकारी असल्याचे समोर आले आहे. टोळीने बनावट ट्रस्ट, बोगस आस्थापने आणि व्यवहार यांद्वारे वक्फच्या मौल्यवान भूमी हडपल्या. या व्यवहारात वक्फ बोर्डाच्या अधिकार्यांचीही लागेबंध असल्याचे दिसून येत आहे. अमीन नूर महंमद शेखची ‘राहत प्रॉपर्टीज’ नावाने आस्थापन असून उदानशाह वाली मशिदीच्या बांधकामाच्या नावाखाली ६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केली आहे. आजतागायत ही मशीद बांधण्यात आली नाही. हा पैसा अमीन नूर महंमद शेख यांनी कॅम्प आणि नाना पेठ परिसरात खासगी मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरला आहे. |