हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
चर्चा हिंदु राष्ट्राची ! या चर्चासत्रामध्ये काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाची ३१ वर्षे या विषयावर परिसंवाद
पुणे – काश्मिरी हिंदूंचे विस्थापन म्हणजे केवळ राजकीय षड्यंत्र नसून हिंदु धर्मावरील आघातच आहे. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर आमचा वंशविच्छेद झाला आहे, हे प्रथम अधिकृतरित्या मान्य करावे लागेल. हे मान्य केले नसल्याने देशभरातील हिंदूंसाठी धोका निर्माण झाला आहे. जेनोसाईड बिल (नरसंहाराविषयी विधेयक) आल्यानंतरच काश्मिरी हिंदूंमध्ये एक विश्वास निर्माण होऊ शकेल. काश्मिरी हिंदूंना पुनर्वसन करायचेच नाही, असे खोटे सांगितले जात आहे. पूर्वी हिंदु धर्मच राजकारणाला नियंत्रित करत होता; परंतु आज राजकारण धर्माला नियंत्रित करू पहात आहे. काश्मीरमध्ये पनून काश्मीरची स्थापना व्हायलाच हवी, असे प्रतिपादन यूथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चर्चा हिंदु राष्ट्राची या कार्यक्रमांतर्गंत काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाची ३१ वर्षे या विशेष परिसंवादात बोलत होते. या कार्यक्रमात एपिलोग न्यूज चॅनलचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. टिटो गंजू आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी काश्मिरी हिंदूंवर ओढवलेल्या भयानक परिस्थितीविषयी एक ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री आणि श्री. कार्तिक साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यू ट्यूब आणि फेसबूक यांच्या माध्यमांतून २९ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिला.
काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे ! – राहुल कौल
कलम ३७० हटवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. काश्मिरी हिंदूंचा झालेला छळ अद्यापही का सोसला जात आहे ? विस्थापित काश्मिरी हिंदूंनी पुनर्वसन होतांना काश्मीरमध्ये जायचे कुठे ? सर्व काश्मिरी हिंदूंच्या मूळ जागा पालटल्या गेल्या. नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे शेजारील देशांतून हिंदूंना बोलावण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत, मग आपल्याच राष्ट्रातील काश्मिरी हिंदूंसाठी आपण प्रयत्न करण्यात अल्प का पडत आहोत ? कलम ३७० नंतर स्थिती तीच आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाला काश्मीरमध्ये रहाण्यासाठी सिद्धता करता येईल, असे सांगितले जाते; परंतु काश्मिरी हिंदूंचे पुन्हा ८ व्या वेळी पलायन होणार नाही, हे सरकार ठामपणे सांगू शकते का ? काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे.
काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे भारतियत्वाचे पुनर्वसन ! – चेतन राजहंस
सामान्य भारतीय हिंदूला वर्ष १९९० मध्ये एवढा मोठा नरसंहार झाला होता, हेच मुळी ठाऊकच नाही. काश्मीरमध्ये इस्लामी राज्यच असेल, असे त्या वेळी वातावरण निर्माण केले गेले. गेल्या ३१ वर्षांमध्ये सुरक्षेचे अभिवचन देणारा एकही नेता निर्माण झाला नाही. ज्या भीतीच्या वातावरणात काश्मिरी हिंदूंचे विस्थापन झाले, त्या वातावरणात पुन्हा काश्मिरी हिंदूंनी जाऊन रहाणे अशक्य आहे. काश्मिरी हिंदूंना प्राधान्याने सुरक्षेची आवश्यकता आहे आणि ती सुरक्षा शासनाने पुरवायला हवी. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे भारतियत्वाचे पुनर्वसन आहे. हिंदु समाज आपल्या अस्तित्वाचे रक्षण स्वतः करू शकतो, हे संपूर्ण विश्वाला दाखवून द्यायचे आहे. सर्वत्रच्या हिंदूंनी पनून काश्मीरला समर्थन द्यायला हवे. एका व्यक्तीलाही जागृत करता आले, तर आपले काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनात एक मोलाचे कार्य झाल्यासारखेच आहे.
.@HinduJagrutiOrg आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की..’
🔸कश्मीरी हिन्दुओं के निष्कासन के 31 वर्ष !
– अधिवक्ता @AnkurSharma_Adv
– अधिवक्ता @titoganju
– @RahulCaul
– @1chetanrajhans🗓️20.1.2021 । सायं. 7 बजे
Watch Live @
🔸 https://t.co/EX4fRqsOwu
🔸 https://t.co/cShxCfue51 pic.twitter.com/mcpzwF6Qf3— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 19, 2021
जेनोसाईड बिलमुळे विश्वातील हिंदूंवरील नरसंहाराचे आक्रमण भारताला थेटपणे परतवून लावता येईल ! – अधिवक्ता टिटो गंजू
जेनोसाईड (नरसंहार) चे आठ टप्पे असतात आणि ते ओळखून त्वरित कार्य करणे आवश्यक आहे. काश्मिरी हिंदू नरसंहाराचे बळी आहेतच; परंतु ते नरसंहार नाकारल्याचेही बळी आहेत. पाकिस्तान निश्चितच या विस्थापनाला कारणीभूत आहे. तत्कालीन भारत सरकारने हा वंशविच्छेद नाही, हे म्हणणेही विस्थापनाला तितकेच कारणीभूत आहे. राज्य सरकारने आजपर्यंत झालेल्या सर्व हत्यांची नोंद अद्यापही आपल्याकडे उपलब्ध नाही. आजपर्यंत एकाही आरोपीला अटक होऊन शिक्षा झाली नाही. जेनोसाईड बिलमुळे विश्वातील हिंदूंवर होणारे नरसंहाराचे आक्रमण भारताला थेटपणे परतवून लावता येईल. काश्मिरी हिंदूंचे ७०० वर्षांमध्ये ७ वेळा विस्थापन झाले आहे. गजवा ए हिंदच्या फतव्यानुसार संपूर्ण भारतीय भूमीला इस्लामिक राजवट करण्याचे जिहाद्यांचे ध्येय आहे. प्रत्यक्षातही हिमालय प्रदेशातील भूमीला इस्लामी राजवट आणण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही काश्मिरी हिंदूंना कुणीही पूर्णपणे संपवू शकलेले नाही, यामागे एक दैवी शक्तीच आहे.