Jaishankar On Minorities In Pakistan : आम्ही पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवतो !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली माहिती

नवी देहली – भारत पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या छळाच्या १० घटना नोंदवल्या गेल्या. एक सरकार आणि एक देश म्हणून, आपण आपल्या शेजार्‍याची मानसिकता पालटू शकत नाही, जी मूलगामी आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही हे करता आले नाही. पाकिस्तान सरकार अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी कारवाई करत नाही.

वर्ष २०१४ पासून पाकिस्तानातून भारतात येणार्‍या अल्पसंख्यांकांना १५ सहस्र १९ दीर्घकालीन व्हिसा देण्यात आले आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी लोकसभेत दिली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी ‘पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील गुन्हे आणि अत्याचार’ या विषयावरील प्रश्नाला ते उत्तर देत होते.

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, फेब्रुवारीमध्येच शीख समुदायाशी संबंधित ३ घटना घडल्या. अहमदिया समुदायाशी संबंधित २ प्रकरणे आणि ख्रिस्ती समुदायाशी संबंधित १ प्रकरण घडले होते. आम्ही ही सूत्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करतो. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधील आमच्या प्रतिनिधीने निदर्शनास आणून दिले की, पाकिस्तान हा असा देश आहे जिथे ‘मानवी हक्कांचे उल्लंघन, अल्पसंख्यांकांचा छळ आणि लोकशाही मूल्यांचे पद्धतशीर र्‍हास’ ही राज्य धोरणे आहेत. (संयुक्त राष्ट्र हे बुजगावणे आहे. तेथे उपस्थित केलेली सूत्रे केराच्या टोपलीत जातात, त्याला काहीच अर्थ रहात नाही, हे लक्षात घेऊन त्याच्या पुढे जाण्याची आता आवश्यकता आहे ! – संपादक)

शशी थरूर

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी डॉ. जयशंकर यांच्या विधानाचे केले समर्थन

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी एस्. जयशंकर यांच्या या विधानाचे समर्थन केले आणि म्हटले की, सरकार पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी चिंतित आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या कल्याणाची आम्हाला काळजी आहे याचे स्पष्ट संकेत आहेत; पण समस्या अशी आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय संवाद होत नाही, अन्यथा आम्ही आमच्या चिंता थेट पाकिस्तानला व्यक्त करू शकलो असतो आणि समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करू शकलो असतो. (देशात काँग्रेसचे सरकार असतांना काँग्रेसने कितीतरी वेळा पाकशी चर्चा केली, त्यातून हे का साध्य झाले नाही, याचे उत्तर थरून यांनी दिले पाहिजे ! – संपादक) परराष्ट्रमंत्र्यांचे विधान पूर्णपणे तथ्यात्मक होते आणि आपल्या शेजारील देशांमध्ये अतिशय त्रासदायक परिस्थिती आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

संपादकीय भूमिका

केवळ लक्ष ठेवून काहीच उपयोग होत नाही; कारण पाकमध्ये वर्ष १९४७ मध्ये अनुमाने २० टक्के असणारे हिंदू आता केवळ १ टक्केच राहिले आहेत. भारत केवळ लक्ष ठेवून राहिला, तर उद्या हे हिंदूंही उरणार नाहीत. अफगाणिस्तानमध्ये हिंदू औषधालाही नाहीत आणि बांगलादेशातही हीच स्थिती येणार आहे. भारताने आता गांधीगिरी थांबवली पाहिजे अन्यथा इतिहास क्षमा करणार नाही !