वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्सव – द्वितीय दिवस (२५ जून) : अनुभवकथन आणि उपासनेचे महत्त्व

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना करू ! – आचार्य चंद्र किशोर पराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी, बिहार

आचार्य चंद्र किशोर पराशर

हिंदु राष्ट्र ही काळाची आवश्यकता आहे. आमच्या संघटनेसारख्या छोट्या संघटना वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातून धर्मकार्यासाठी ऊर्जा घेऊन जात आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हिंदु राष्ट्राची स्थापना करू. त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या आधारावर प्रत्येक हिंदूपर्यंत हिंदु राष्ट्राची संकल्पना पोचवू. या धर्मकार्यासाठी भगवान परशुरामाप्रमाणे ब्राह्म आणि क्षात्र तेजाची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना ही केवळ कल्पना नाही, तर वास्तव आहे. काही लोक हिंदु राष्ट्राला विरोध करतील, त्याला सामोरे जाण्याचीही सिद्धता आपण ठेवायला हवी.


गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा ! – राजीव झा, राष्ट्रीय उपाध्यक्ष, केसरिया हिंदु वाहिनी, गोवा

श्री. राजीव झा

ज्या देशात गोमातेची दुर्दशा चालू आहे, त्या देशात आपण हिंदु राष्ट्राची कल्पना  करू शकत नाही. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यापूर्वी गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करायला हवे. गोमातेविना हिंदु राष्ट्राची कल्पना अधुरी आहे. गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे उद्गार ‘केसरिया हिंदु वाहिनी, गोवा’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीव झा यांनी काढले.

ते पुढे म्हणाले की, हिंदु धर्मात देशी गायीला ‘गोमाता’ असे संबोधले आहे. पहिला घास गोमातेला द्यायला हवा, ही हिंदु धर्माची शिकवण आहे. सद्यस्थितीत गोरक्षकांना धमकावले जात आहे, त्यांच्यावर गुंडाकरवी आक्रमण केले जात आहे. गोतस्करांकडेच गायींना सोपवले जात आहे. प्रतिदिन अनेक गोवंशियांची हत्या केली जात आहे. परशुरामभूमी संबोधल्या जाणार्‍या गोमंतकात गोवंश सुरक्षित नाही. ज्या दिवशी गोमातेला राष्ट्रमाता घोषित केले जाईल, तेव्हाच भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.


हिंदु राष्ट्राचे कार्य थांबवण्यासाठी ‘हिंदु आतंकवादा’चे कथानक रचण्याचा प्रयत्न ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

समझौता एक्सप्रेस बाँबस्फोट, अजमेर बाँबस्फोट, मालेगाव स्फोट प्रकरण असो किंवा डॉ. दाभोलकर हत्या आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरण असो, अशा विविध प्रकरणांत निरपराध हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली; पण त्यांच्या विरोधात काहीच पुरावे मिळाले नाहीत. यात त्यांचे जीवन मात्र उद्ध्वस्त झाले. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना कारागृहात टाकायचे आणि त्यांच्याविषयी ‘हिंदु आतंकवादा’चे हे खोटे कथानक चालवून त्यांची अपकीर्ती करायची, हे हिंदुविरोधी शक्तींचे षड्यंत्र होते. यातून त्यांना हिंदु राष्ट्राचे कार्य थांबवायचे होते, असे उद्गार सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त काढले.

ते म्हणाले, ‘‘डॉ. दाभोलकर हत्या आणि कॉ.पानसरे हत्या प्रकरणांतही २५ हून अधिक निरपराध हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते अद्यापही कारागृहात आहेत. ते कोणत्याही संघटनेचे असले, तरी ‘हिंदु आतंकवाद’ हे कथानक सिद्ध करणार्‍यांसाठी ते हिंदूच आहेत. अशा हिंदुत्वनिष्ठांच्या मागे आपली संवेदना कायम असली पाहिजे आणि त्यांना सोडवणे हे प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनेला स्वतःचे कर्तव्य वाटले पाहिजे. आज वृत्तवाहिन्या हिंदु संघटनांच्या बाजूने नाहीत. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना खोट्या कथानकांना सत्याच्या आधारावर तोंड द्यायचे आहे. त्यासाठी आपली ‘इकोसिस्टिम’ अधिक बलवान करणे आवश्यक आहे. आपला पथ धर्माचा आहे. त्यामुळे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील; पण ते आपल्याला नष्ट करू शकणार नाहीत. धर्माच्या मार्गावर चालत असल्यामुळे आपले कुणी वाईट करू शकत नाही. या संघर्षात आपलाच विजय होणार असून हिंदु राष्ट्राची स्थापना निश्चितपणे होणार आहे.’’


हिंदु राष्ट्राचे शिवधनुष्य उचलण्यासाठी आध्यात्मिक बळ आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

हिंदु राष्ट्राचे शिवधनुष्य उचलण्यासाठी प्रत्येकाला आध्यात्मिक बळाची आवश्यकता आहे. पांडव महारथी होते, तरीही त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य घेतले होते. त्यामुळे आपणही ईश्वराचे साहाय्य घेणे आवश्यक आहे. रज-तमयुक्त शत्रूशी लढण्यासाठी रज-सत्त्व किंवा सत्त्व-रज गुणांची आवश्यकता आहे आणि ते केवळ साधनेने वाढू शकतात. आपल्याहून अनेक पटींनी सामर्थ्यवान असलेल्या शत्रूशी लढण्यासाठी प्रचंड सामर्थ्यवान असलेल्या ईश्वराची उपासना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवशी उपस्थितांना केले.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘जो धर्माचरण आणि साधना करतो, त्याला धर्मशक्तीची अनुभूती येते. साधना केल्याने आपल्याला धर्माचे महत्त्व, श्रेष्ठत्व समजते. असा धर्मनिष्ठ व्यक्ती कधीही धर्माची हानी करू शकत नाही, तसेच तो धर्माची हानी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि ती थांबवण्याचा प्रयत्न करतो. जो साधना करतो, त्याला धर्म कार्य करतांना ‘माझ्या पाठीशी ईश्वरी शक्ती आहे’, याची जाणीव असते. त्यामुळे त्याला अपयशाने निराशा येत नाही. त्याचा समर्पणभाव टिकून रहातो, तसेच साधना केल्याने त्याला कर्मफळाची अपेक्षा रहात नाही. त्यामुळे त्याचे कार्य निष्काम कर्मयोग्याप्रमाणे होते. त्यामुळे त्याची साधना होते आणि त्याला ईश्वराची शक्ती प्राप्त होते. कलियुगात नामस्मरण ही श्रेष्ठ साधना आहे आणि त्यामुळेच आध्यात्मिक बळ मिळते.’’