वैदिक कर्मकांड – एक विज्ञान !

प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी

‘मासिक पाळीमागे कोणतेही धार्मिक कारण नाही. पूर्वीच्या व्यवस्था आजसारख्या नव्हत्या. म्हणून महिलांना बाहेर किंवा मंदिरात जाण्यास अनुमती नव्हती. आता आपले विचार पालटले पाहिजेत’, असे मत प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी यांनी व्यक्त केले आहे. दुर्दैवाने या संदर्भातील धर्मशास्त्र आज माहिती नसल्यामुळे तत्त्वज्ञ, आध्यात्मिक किंवा धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीही या पद्धतीच्या संदर्भात आधुनिक पद्धतीची विधाने करत आहेत. शौच-अशौच किंवा सोवळे-ओवळे हे कर्मकांडानुसार पाळावे लागते. त्याच्या अंतर्गत येणारी बंधने पाळणे, ही साधना असते.

केवळ संबंधित स्त्रीच्याच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या दृष्टीने हे कसे लाभकारक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अधिक सात्त्विकता असते. एखादे देवस्थान जागृत असल्यास त्या ठिकाणी त्या देवतेची शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत असते. याउलट मासिक धर्माच्या काळात महिलांमधील रजोगुण वाढलेला असल्यामुळे त्यांना मंदिरात गेल्यावर त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मासिक धर्माच्या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, हे हिंदु धर्मात सांगितले आहे. हे या मागील सूक्ष्म धर्मशास्त्र आहे. जर्मनीमध्ये औषध निर्माण करणारे एक आस्थापन महिला कर्मचार्‍यांना मासिक पाळीच्या काळात सुटी देते; कारण मासिक पाळीच्या काळात काही महिलांच्या शरिरातून विशिष्ट संप्रेरक आणि घामाद्वारे रासायनिक घटक बाहेर पडतात. अशा वेळी जर त्या महिलांनी औषध सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत भाग घेतला, तर औषधांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादित औषधाची शुद्धता, परिणामकारकता आणि सुरक्षितता यांवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांच्या लक्षात आले. पाश्चात्त्य संशोधकांमध्ये नारीशास्त्रज्ञ वेल्डे, ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ प्रा. शिक यांनी या विषयावर बरेच संशोधन केले आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात हिंदु धर्मात सांगितलेले नियम एकप्रकारे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत ! शस्त्रक्रियागृहात जशी सर्वांना जायची अनुमती नसते; कारण तेथील स्वच्छता टिकवली, तर त्याचा लाभ सर्व रुग्णांना होणार आहे. त्याचप्रमाणे मंदिर हे सात्त्विक स्थळ आहे आणि मासिक पाळी ही रज-तम प्रधान ! मंदिरात जातांना मंदिरातील नियम पाळले, तर तेथील पावित्र्यता टिकून राहू शकते आणि त्याचा संपूर्ण समाजाला लाभ होऊ शकतो. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याचा स्रोत आहेत. या स्रोतावर रज-तमाचा परिणाम होऊ नये, म्हणून मासिक पाळीच्या काळात तेथे न जाण्याने संपूर्ण समाजाला त्याचा लाभ मिळतो.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे.