आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (३१ मार्च २०२५)

मुंबईत पाणीगळती !

मुंबई – मुलुंड पश्चिम भागातील टी विभागाला पाणीपुरवठा करणार्‍या १८०० मिलीमीटर व्यासाच्या महत्त्वाच्या जलवाहिनीवर मोठी गळती आढळून आली. त्यामुळे तेथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून त्यासाठी १० ते १२ घंट्यांचा कालावधी लागू शकतो.


मुंबईतील पोलिसाचा अपघाती मृत्यू !

मुंबई – मुंबईच्या पोर्ट झोनमध्ये पोस्टिंग असलेले पोलीस अधिकारी सुधाकर पठारे यांचा अपघाती मृत्यू झाला. ते एका नातेवाईकासोबत तेलंगाणा येथील ज्योतिर्लिंग श्रीशैलमच्या दर्शनासाठी जात असतांना हा अपघात घडला. यात सुधाकर पठारे यांच्यासह नातेवाइकाचाही मृत्यू झाला. पठारे यांचे वाहन ट्रकला धडकले. सुधाकर पठारे हे वर्ष २०११ च्या बॅचचे आयपीएस् अधिकारी होते.


नक्षलवाद्यांकडून वृद्धाची हत्या !

गडचिरोली – भामरागड तालुक्यातील जुवी या अतीदुर्गम गावात नक्षलवाद्यांनी एका निरपराध आदिवासी वृद्धाची २९ मार्चच्या मध्यरात्री गळा दाबून हत्या केली. पुसू गिबा पुंगाटी (वय ६० वर्षे) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. मध्यरात्री ४  नक्षलवाद्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजावर थाप मारली. ते पुसू यांना जंगलात घेऊन गेले. तेथे वरील प्रकार घडला.


तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी निधी संमत !

सातारा, ३० मार्च (वार्ता.) – मुंबईवरील आतंकवादी आक्रमणांमध्ये कर्तव्यावर असतांना पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे हुतात्मा झाले. हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकासाठी राज्यशासनाने १३ कोटी ४६ लाख ३४ सहस्र रुपयांचा निधी संमत केला आहे. मुंबई येथे झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यातील कामासाठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.


परंपरेसह विकासाची गुढी उभारूया ! – उपसभापती डॉ. गोर्‍हे

पुणे – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संदेश दिला. ‘आज आमच्या घरी, सिल्वर रॉक्स येथे मी आणि माझी भगिनी जेहलम जोशी यांनी गुढी उभारली आहे; मात्र खरी आवश्यकता आहे, ती प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद, उत्साह, आशा आणि विकासाची गुढी उभारण्याची’, असे त्यांनी सांगितले.


धर्मांधांकडून २४ लाख रुपयांची फसवणूक !

पुणे – एकटे रहाणार्‍या ज्येष्ठाची सोसायटीतील रखवालदाराने २४ लाख ४८ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हडपसर येथे उघडकीस आला. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी इफ्तेखार रहीमखान पठाण आणि हनीफ महंमद अफसर यांना अटक केली. (गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले अल्पसंख्य धर्मांध ! – संपादक) तक्रारदार महिला बेंगळुरूत नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील हडपसर भागातील सोसायटीत रहायला आहेत.