
कोल्हापूर, ३० मार्च (वार्ता.) – अलीकडच्या काळात मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर आणि जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. तरी कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री महालक्ष्मी देवस्थानातील श्री महालक्ष्मीदेवी-आई अंबाबाईदेवीच्या मंदिरात पावित्र्य टिकवणे, हे महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे, असे आम्ही समजतो. यामुळे या मंदिरात येतांना सात्त्विक वेशभूषा करून हिंदूंनी यावे, यासाठी आपल्या मंदिर व्यवस्थापनाने श्री महालक्ष्मीदेवी – आई अंबाबाईदेवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी, मागणीसाठी ३० मार्च या दिवशी श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक श्री. अनिल दिंडे यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे श्री. दिंडे यांनी सांगितले.
या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. शरद माळी, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे श्री. सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.
संपादकीय भूमिका :यासाठी निवेदन का द्यावे लागते ? मंदिर प्रशासनाने ते स्वत:हून केले पाहिजे ! |