तुळजाभवानी मंदिर जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार !

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाच्या बैठकीतील निर्णय !

श्री तुळजाभवानीदेवी मंदिर

मुंबई – तुळजाभवानी मंदिर आता जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २९ मार्च या दिवशी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक पार पडली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,

१. श्रीक्षेत्र तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ बनवण्यासाठी स्थानिकांचा सहभाग घेत शाश्वत विकास करणे आवश्यक आहे. यासाठी तुळजापूर विकास आराखड्याची कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे. या आराखड्यामुळे भाविकांना आई तुळजाभवानीचे सुलभ आणि जलद दर्शन मिळेल. सध्याच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावून नवीन सुविधा विकसित केल्या जातील, तसेच मंदिराचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा यांचे संवर्धन होईल.

२. विकास आराखड्यातील कामांसाठी ७३ एकर भूमी आवश्यक असून या भूसंपादनासाठी ३३८ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. एकदा भूसंपादनाची कामे पूर्ण झाली की, विकास आराखड्यातील इतर कामांना गती मिळेल. त्यामुळे ही कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.