Hindus Exodus In Bhopal : भोपाळमधील मुसलमानबहुल भागांतून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर

रा.स्व. संघाकडून चिंता व्यक्त !

मुसलमानबहुल भागांतून हिंदूंचे स्थलांतर !

भोपाळ (मध्यप्रदेश) – जुन्या भोपाळमधील कोहेफिजा आणि शाहजहानाबाद यांसारख्या मुसलमानबहुल भागांव्यतिरिक्त सिंधी कॉलनीसह अनेक वसाहतींमधून हिंदु कुटुंबांच्या स्थलांतराच्या बातम्या बर्‍याच काळापासून येत असतांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही समस्या थांबवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.

१. संघाला अंतर्गत माहितीवरून असे कळले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून कोहेफिजामध्ये सर्वाधिक स्थलांतर सातत्याने होत आहे. २ वर्षांपूर्वीही हा विषय चर्चेत आला होता, जेव्हा भोपाळमधील भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून कॉलनीतील भूमी आणि घरे यांच्या खरेदी-विक्रीची चौकशी करण्याची मागणी केली होती.

२. आमदारांनी माहिती दिली होती की, कोहेफिजा येथून मोठ्या संख्येने माहेश्वरी, ब्राह्मण, जैन आणि सिंधी कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. ५ सहस्र घरांच्या या वसाहतीत आधी ८० टक्के हिंदू कुटुंबे होती, आता केवळ ४० टक्के उरली आहेत. येथून ते लालघाट किंवा जवळच्या इतर भागात स्थायिक झाले आहेत.

३. मध्य भारतातील प्रांतीय संघचालक अशोक पांडे म्हणाले की, संघाचे लोक अशा वसाहतींमध्ये जातात आणि लोकांना समजावून सांगतात की, भविष्यात कोणत्याही अनपेक्षित भीतीने घाबरून रहाणे योग्य नाही. हिंदूंना स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांना कुणाचीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. सर्व हिंदू त्यांच्यासमवेत उभे आहेत आणि संघही त्यांच्यासमवेत उभा आहे.

४. संघाने विविध समस्यांवर एक सर्वेक्षण केले होते. ज्यामध्ये लव्ह जिहाद, धार्मिक जागरूकतेचा अभाव, मूल्यांचे शिक्षण न देणे, अस्वच्छता, हिंदु कुटुंबांचे स्थलांतर, अशा १०३ प्रकारच्या समस्या समोर आल्या. ज्यामध्ये भोपाळमधून हिंदूंचे स्थलांतर, हे सर्वांत गंभीर आहे. हे सूत्र बेंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत उपस्थित झाले होते.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात जवळपास २० वर्षे भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती राज्याच्या राजधानीत असणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही. याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !