छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद !

डावीकडून श्री. किरण दुसे, श्री. दीपक देसाई, श्री. आनंदराव पवळ, श्री. सुनील घनवट, श्री. मनोहर सोरप, श्री. आशिष लोखंडे, श्री. पराग फडणीस आणि श्री. शिवानंद स्वामी

कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. ते १५ जुलैला कोल्हापूर प्रेस क्लब येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कोल्हापूर येथे बोलत होते.

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना श्री. सुनील घनवट आणि उपस्थित पत्रकार

या प्रसंगी भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

१. श्री. आशिष लोखंडे म्हणाले, ‘‘आज ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’वर दावा सांगणारा वक्फ बोर्ड उद्या विशाळगडावरील असलेल्या दर्ग्यावर दावा सांगतील आणि अख्खा विशाळगड आमचा आहे, असे सांगण्यासही मागे-पुढे पहाणार नाही.’’

२. श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘ही मूळ जागा छत्रपती शाहू महाराज यांची असल्याने या प्रकरणी आताच्या छत्रपती शाहू महाराज यांनी लक्ष घालावे, अशी आमची विनंती आहे. वक्फ बोर्डाने ही सोसायटी कह्यात घेण्यापेक्षा हा सर्व ट्रस्ट त्यांनीच कह्यात घ्यावा, असे आम्हाला वाटते.’’

वक्फ बोर्ड मोठ्या प्रमाणात भूमी अधिग्रहित करत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? – सुनील घनवट

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले ‘‘छत्रपती शाहू महाराजांनी सदर भूमी ही मुसलमानांसह अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचे साधन मिळावे, म्हणून दिली होती. ती केवळ मुसलमानांसाठी वा धार्मिक प्रयोजनासाठी दिलेली नव्हती. असे असतांना वक्फ कायद्याचा दुरुपयोग करून त्यांची भूमी बळकावून मागास समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. महाराष्ट्रात आणि कोल्हापूर जिल्ह्यातही वक्फ बोर्डाने हिंदूंच्या भूमी कह्यात घेण्यास प्रारंभ केला आहे. वर्ष २००९ मध्ये ४ लाख एकर भूमी असलेल्या ‘वक्फ बोर्डा’कडे वर्ष २०२३ मध्ये ८ लाख एकर भूमी कशी काय आली ? इतक्या मोठ्या प्रमाणात वक्फ बोर्ड भूमी अधिग्रहित करत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ?’’

या पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाविषयी केंद्रीय स्तरावर तपास व्हायला हवा, ‘वक्फ बोर्डा’ची संपूर्ण चौकशी करून बेकायदेशीरपणे लाटलेली सर्व भूमी संबंधितांना परत केली पाहिजे, तसेच दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.

(सौजन्य : channel B) 

वक्फच्या विरोधात न्यायालयीन लढा चालू !

एका पत्रकाराने विचारले की, यापुढील आंदोलनाची दिशा कशी असेल ? आणि केंद्रीय स्तरावर हा विषय पोचवण्यासाठी तुम्ही काय करत आहात ? या संदर्भात श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘वक्फ’च्या विरोधात आम्ही राज्य आणि देश पातळीवर लढत आहोत. या संदर्भात अन्य अधिवक्त्यांच्या साहाय्याने आम्ही न्यायालयीन लढा देत आहोत, तसेच विधानसभा-लोकसभा येथेही हा प्रश्‍न उपस्थित करून त्याला वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’’

क्षणचित्रे

१. या प्रसंगी श्री. आनंदराव पवळ म्हणाले, ‘‘जर उत्तरप्रदेशात योगी सरकार राज्यभरात वक्फ बोर्ड भूमी किती आहे ? याच्या अन्वेषणाचे आदेश देऊ शकते, तर असेच आदेश महाराष्ट्र राज्यात आणि देशभरात देण्यात यावेत. ‘वक्फ’ने भूमी कह्यात घेणे हा ‘लँड जिहाद’चाच एक प्रकार असून हा कायदा रहित झालाच पाहिजे.’’

२. पत्रकार परिषद झाल्यावर अनेक पत्रकारांनी ‘हा विषय इतक्या सखोल आम्हाला ठाऊक नव्हता, तसेच ‘वक्फ’च्या माध्यमातून चालू असलेले षड्यंत्रही लक्षात आले. या पत्रकार परिषदेमुळे त्याची दाहकता लक्षात आली’, असे सांगितले.

या मागणीच्या संदर्भात रविवार, १६ जुलैला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे, तरी राष्ट्रप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी या प्रसंगी केले.

हे ही वाचा – 

‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ (मुस्लिम बोर्डिंग), कोल्हापूर

कोल्हापूर येथील ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येण्याची शक्यता !
https://sanatanprabhat.org/marathi/699234.html