फळपीक विमा मिळण्याविषयी शेतकर्यांमध्ये चिंता

देवगड – तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्च महिन्यात सातत्याने तापमानात पालट होत राहिला. रात्रीच्या वेळी २५ अंश सेल्सिअस, तर दिवसा ४० अंश सेल्सिअसहून अधिक तापमान होते. मार्च महिन्यामध्ये सलग १२ दिवस ३८ ते ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान होते. याचा विपरित परिणाम आंबा पिकावर होत असून त्याच्या एकूण उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे फळपीक विमा वेळेत मिळण्याविषयी शेतकर्यांमध्ये चिंता पसरली आहे.
देवगड तालुक्यामध्ये सुमारे ४० ते ४५ सहस्र हेक्टर भूमीवर आंबा, तर ६ सहस्र हेक्टर भूमीवर काजू यांची लागवड आहे. देवगड हापूस आंब्याचे यावर्षी उत्पादन हे २५ टक्केच आहे. हवामानात सातत्याने पालट होत राहिल्याने उत्पादनामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तवण्यात येत आहे.
१ डिसेंबर ते १५ मेपर्यंतच्या कालावधीमध्ये न्यून-अधिक तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ अशा आपत्ती आल्यास फळपीक विम्याचा लाभ शेतकर्यांना होतो. देवगड तालुक्यामधील ४ सहस्र आंबा बागायतदार शेतकर्यांनी यावर्षी भारतीय कृषी विमा आस्थापनाकडे फळपीक विमा उतरवला आहे. २ वर्षांपूर्वी अवकाळी पाऊस पडूनही विमा आस्थापनांनी शेतकर्यांची फसवणूक केली होती. त्यामुळे यंदा विम्याचा लाभ आस्थापन देणार का ? कि पुन्हा एकदा बागायतदारांची लूटमार करणार ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
वातावरणातील पालटांची नोंद करण्यासाठी प्रत्येक महसूल मंडळनिहाय यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा नादुरुस्त असल्याने याचा विपरित परिणाम फळपीक विमा घेतलेल्या आंबा बागायतदारांवर होऊ शकतो. देवगड तालुक्यामध्ये देवगड, पडेल, पाटगाव, मिठबाव, बापर्डे, शिरगाव आणि तळवडे अशी महसूल मंडळे आहेत.