|
सावंतवाडी – बेळगाव येथून खासगी चारचाकी वाहनातून सावंतवाडी येथे गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी वाहनाचा पाठलाग करत ती रोखली. चालक सर्फराज भाऊद्दीन ख्वाजा (बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याला गोरक्षकांनी पोलिसांच्या कह्यात दिले आहे. सर्फराज याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील माडखोल येथे २९ मार्चला सकाळी ७.३० च्या सुमारास ‘स्विफ्ट’ वाहनातून १३० किलो गोमांस सावंतवाडीत आणले जात होते. गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती हिंदु संघटनांना मिळाली होती. त्यामुळे पहाटेपासून बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, गोरक्षक सिंधुदुर्ग आणि हिंदू जागरण मंच या संघटनांचे कार्यकर्ते बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर थांबले होते. या वेळी एक संशयास्पद वाहन माडखोल येथे आल्यावर ते थांबवण्यात आले. आरंभी वाहनचालक सर्फराज याने उलटसुलट उत्तरे दिली; मात्र वाहनाची तपासणी केल्यावर त्यात गोमांस आढळून आले.
यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी सर्फराज याला पोलिसांकडे सोपवले. पोलिसांनी चौकशी केली असता सर्फराज याने वाहनात गोमांस असून गेली अनेक वर्षे हा व्यवसाय करत असल्याचे मान्य केले, तसेच याविषयी क्षमा मागून ‘यापुढे असा व्यवसाय करणार नाही’, असे सांगितले. या घटनेनंतर सावंतवाडी तालुक्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून ‘सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोणताही गैरप्रकार घडू नये’ यासाठी पोलिसांनी खबरदारीची पावले उचलली आहेत.