‘चिकन’च्या नावाने दिल्या गुरांच्या जिभा

पणजी, २९ मार्च (वार्ता.) – देहली येथून रेल्वेमधून वास्को येथे चिकनच्या नावाखाली गुरांच्या जिभा पाठवण्याचा प्रकार बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि वास्को रेल्वे पोलीस यांच्या सतर्कतेमुळे २९ मार्च या दिवशी उघडकीस आला. देहली येथून रेल्वेद्वारे १७९ किलोग्रॅमचे २ गठ्ठे पाठवण्यात आले होते. हे गठ्ठे वास्को पोलिसांनी कह्यात घेतले आहेत, तसेच हे गठ्ठे कह्यात घेण्यासाठी आलेल्या जाबर नूसाहमेद सिद्नूर (वय ३३ वर्षे) या आके, मडगाव येथील व्यक्तीला याला कह्यात घेतले आहे.
देहली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वेमधून वास्को रेल्वेस्थानकावर २ गठ्ठे पाठवण्यात आले आणि यामध्ये ‘चिकन’ असल्याचे म्हटले होते. यामध्ये ‘चिकन’ असल्याने हे गठ्ठे कुठेही तपासले गेले नाहीत; मात्र ‘चिकन’ऐवजी गुरांच्या जिभा पाठवण्यात येत असल्याची कुणकुण येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना लागली होती. यामुळे हे कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून सतर्क होते. काही दिवसांपूर्वी देहली येथून गोमांसाची गोव्यात तस्करी होत असल्याचे उघडकीस आले होते. ‘चिकन’च्या नावाखाली गोमांस पाठवण्यात आले होते. रेल्वे वाहतुकीतील काही त्रुटींचा लाभ उठवून हा प्रकार केला गेल्याचे या वेळी सांगण्यात आले होते आणि असा प्रकार अजूनही चालू असल्याने रेल्वे प्रशासन याविषयी अद्याप गंभीर नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.