टोळीतील इतरांच्या विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस
(‘लुक आऊट’ नोटीस म्हणजे आरोपी देश सोडून पळून जाऊ नये; म्हणून काढलेली नोटीस)
पणजी, २९ मार्च (वार्ता.) – गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ११ किलो ६७२ ग्रॅम (बाजार मूल्य ११ कोटी ६७ लाख रुपये) हायड्रोपोनिक वीड गांजा कह्यात घेतला होता. ८ मार्च या दिवशी ही कारवाई करण्यात आली आणि ही गोव्यातील अमली पदार्थांच्या विरोधातील सर्वांत मोठी कारवाई आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३ जणांना कह्यात घेतले आहे, तर टोळीतील थायलंडमध्ये लपलेल्या सदस्यांच्या विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस आणि ‘ब्लू नोटीस’ (गुन्हेगारी अन्वेषणासाठी एखाद्या व्यक्तीची अतिरिक्त माहिती मिळवणे) प्रसिद्ध केली आहे.
पोलिसांनी ८ मार्च या दिवशी बेंगळुरू येथील रहिवासी गौतम एम्. याला सेंट अँथनी वाडा, गिरी, म्हापसा येथे एका भाड्याच्या खोलीतून कह्यात घेतले. त्याच्याकडून ११ किलो ६७२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा कह्यात घेण्यात आला. पोलिसांनी अन्वेषणानंतर १२ मार्च या दिवशी या प्रकरणातील बेंगळुरूमधील मुख्य समन्वयक शिलना ए., तर १९ मार्च या दिवशी कन्नूर, केरळ येथून टोळीचा आर्थिक व्यवस्थापक श्रीजील पी. पी. यांना कह्यात घेतले. संशयितांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना बँकॉक येथून भारतात अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी १ लाख रुपये देऊ केले होते. ही टोळी ‘गोल्डन ट्रायंगल’ नावाच्या अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या जाळ्याशी संबंधित आहे आणि या टोळीच्या माध्यमातून गोव्यात अमली पदार्थांचा पुरवठा होत आहे.