नांदेड जिल्ह्यातील नायगाव धरण गावातील इयत्ता चौथीतील विद्यार्थी प्रतीदिन मद्य पिऊन धिंगाणा घालतात !  

देशी मद्याचे दुकान बंद करण्यासाठी महिलांचे ठिय्या आंदोलन

  • स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांत आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम !
  • अनेक गावांत महिलांनी आंदोलनाद्वारे वारंवार मागणी करूनही महसुलासाठी राज्य सरकार मद्य उत्पादनांवर बंदी घालत नाही. महसुली स्वार्थासाठी सरकार कित्येक संसारच नव्हे, तर उद्याची पिढीही उद्ध्वस्त करत आहे ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद आहे !
(प्रतिकात्मक चित्र)

नांदेड – जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण गावात देशी मद्याच्या दुकानामुळे गावात मद्यापींचा त्रास वाढला आहे. या गावातील मद्य दुकानामुळे प्रथम पुरुषवर्ग व्यसनाधीन झाला. आता इयत्ता ४ थीच्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थीही दहा-दहा रुपये जमवून एकत्र येत दिवसाढवळ्या मद्य पिऊन गावात धिंगाणा घालत आहेत. या घटनांमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी ‘नायगाव धरण येथील देशी मद्याचे दुकान बंद व्हावे आणि आमची पुढची पिढी वाचावी’, अशी मागणी करत धर्माबाद येथील तहसील कार्यालायासमोर २१ जानेवारी या दिवशी ठिय्या आंदोलन केले.

१. नायगाव धरण हे गाव तेलंगाणा राज्यालगत आहे. या गावात तेलंगणापेक्षा मद्य स्वस्त मिळत असल्याने या गावात तेलंगणातील लोकांची सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ये-जा चालू असते.

२. या गावातील बहुतांश पुरुष मद्यपी बनले आहेत. गावातील महिला शेतकामासाठी घराबाहेर गेल्यानंतर मुले मद्य पिऊन गावभर धिंगाणा घालतात. (यावरून प्रत्येक गावातील शाळांमधून विद्यार्थ्यांना लहानपणापासून धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरणी बनवणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

(सौजन्य : MCN URDU NEWS NANDED)

३. याविषयी गावातील श्रीमती रेखा गडामोड म्हणाल्या की, दळवळण बंदीमुळे मुले घरी असल्याने ती प्रतिदिन मेजवानी करतात. आम्ही शेताच्या कामाबासाठी घराबाहेर गेल्यावर ही मुले दहा-दहा रुपये जमा करून मद्य विकत घेऊन पितात. घरी आल्यावर आम्हाला पती आणि मुले या सर्वांचा त्रास होत आहे.

४. श्रीमती देऊबाई कदम म्हणाल्या की, मद्यामुळे आम्हाला पुष्कळ त्रास होत आहे. आमचे पती आणि मुले मद्य पिऊन घरातील महिलांना मारहाणही करतात.