नागपूर येथे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा !
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) : लोकसभेतील ‘व्होट जिहाद’च्या षड्यंत्राला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंनी ‘एक हैं, तो सेफ हैं’द्वारे (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) चोख प्रत्युत्तर दिले. हिंदूंनी बहुमत देऊन आम्हाला निवडून दिले, याची जाणीव ठेवून आम्हीही हिंदुत्वासाठी समर्पित होऊन कार्य करू, अशी ग्वाही लोकप्रतिनिधींनी समस्त हिंदूंना दिली आहे. हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्यात ‘देव, देश, धर्म आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी महायुती सरकार कटीबद्ध आहे’, अशी ग्वाही धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींनी हिंदूंना दिली. ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष करत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी योगदान देण्याचे आश्वासन या वेळी लोकप्रतिनिधींनी दिले. १९ डिसेंबर या दिवशी सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून ३ मंत्री, १ राज्यमंत्री यांसह ५ आमदार या सोहळ्याला उपस्थित होते.

भाजपचे मंत्री श्री. अतुल सावे (छत्रपती संभाजीनगर), शिवसेनेचे मंत्री श्री. भरतशेठ गोगावले (महाड), भाजपचे मंत्री श्री. जयकुमार रावल (दोंडाईचा), शिवसेनेचे राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल (रामटेक, नागपूर), शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे (विधान परिषद, मुंबई), भाजपचे आमदार श्री. नारायणराव कुचे (जालना), भाजपचे आमदार श्री. प्रतापराव अडसड (धामणगाव रेल्वे, अमरावती), शिवसेनेचे आमदार श्री. आनंद बोंडारकर (नांदेड) आणि भाजपचे आमदार श्री. राम भदाणे (धुळे) यांनी सोहळ्याला उपस्थित राहून सत्कार स्वीकारला, तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नागपूर येथील ‘गुरुकृपा सेवा संस्थान’चे पू. भगीरथी महाराज, सनातनचे पू. अशोक पात्रीकर आणि ह.भ.प. मनोज महाराज मिरकुटे यांची वंदनीय उपस्थिती या वेळी लाभली. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर कार्यक्रमाला उपस्थित होते.
हिंदू जनजागृति समिति और महाराष्ट्र मंदिर महासंघ द्वारा आयोजित धर्मप्रेमी लोकप्रतिनिधि सम्मान समारोह
देव, देश, धर्म और मंदिरों की रक्षा के लिए महायुती सरकार प्रतिबद्ध : मंत्रियों और विधायकों की गारंटी!
नागपुर – लोकसभा में ‘वोट जिहाद’ की साजिश का महाराष्ट्र विधानसभा चुनाव में… pic.twitter.com/LGsY8Sht8X
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) December 20, 2024
‘हिंदुत्व’ हीच माझ्या राजकारणाची ऊर्जा ! – मंत्री अतुल सावे, भाजप

‘छत्रपती संभाजीनगर येथून मला हिंदु जनतेने निवडून दिले’, याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी हिंदुत्वासाठीच राजकारणात कार्यरत आहे. ‘हिंदुत्व’ ही माझ्या राजकारणाची ऊर्जा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर हिंदूंचे प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले. माझे वडील मोरेश्वर सावे हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ होते. त्यांच्या प्रेरणेमुळेच मी राजकारणामध्ये हिंदुत्वासाठी कार्य करत आहे. बांगलादेशाची निर्मिती झाली, तेव्हा तेथे हिंदू १५ टक्के होते, आता ते ८ टक्के झाले आहेत. भारताची अशी स्थिती व्हायला नको. यासाठी हिंदूंनी सतर्क रहायला हवे. भारतात हिंदू सुरक्षित रहायला हवेत.
संघटित झाल्यास हिंदूंना टक्कर देण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही ! – भरतशेठ गोगावले, मंत्री, शिवसेना

काँग्रेसचे नेते अद्यापही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करत आहेत. हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’मध्ये फसत आहेत. ही सर्व हिंदु धर्मावरील संकटे आहेत. देव, धर्म आणि देश सुरक्षित राहिला, तर आपण सुरक्षित राहू शकतो. हिंदूंनी एकत्र आल्यास त्यांना टक्कर देण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही. ‘एक हैं तो सेफ हैं ।’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) आणि ‘बटेंगे तो कटेंगे ।’ (विभागलो, तर कापले जाऊ) याची शक्ती निवडणुकीत पहायला मिळाली. हिंदूंनी आम्हाला सत्तेत आणले. त्यामुळे हिंदुत्वासाठी योगदान देणे, हे आमचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच हिंदु धर्म टिकून आहे. प्रत्येक हिंदूने महाराजांचा आदर्श घेऊन हिंदुत्वासाठी योगदान द्यायला हवे.
महाराष्ट्रातील सरकार हिंदुत्वासाठी कार्य करेल ! – मंत्री जयकुमार रावल, भाजप

काही अल्पसंख्य या देशावर आधिपत्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत; परंतु हा देश हिंदूंचा होता आणि हिंदूंचा राहील. हिंदूंनी शक्ती पणाला लावल्यामुळे आम्ही निवडून आलो. हिंदूंच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे सरकार हिंदूंच्या हितासाठीच कार्य करेल. हिंदूंनीही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे. हा देश हिंदूंचा होता आणि हिंदूंचा राहील.
मंदिराच्या सुरक्षेसाठी सरकारने ‘सनातन मंडळा’ची स्थापना करावी ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘हिंदूंची मंदिरे का कह्यात घेतली जातात, तर अन्य धर्मियांची का नाहीत ?’, असा प्रश्न उपस्थित केला. देशात एकही मशीद किंवा चर्च सरकारने कह्यात घेतलेली नाही. आंध्रप्रदेश आणि केरळ येथील निधर्मी सरकार कारभार चालवण्यासाठी मंदिरातून कोट्यवधी रुपये घेत आहेत. हे सरकार कोट्यवधी रुपयांची मंदिराची मालमत्ता आणि संपत्ती लुटत आहे. या विरोधात हिंदूंनी लढा देणे आवश्यक आहे. येत्या वर्षभरात सरकारीकरण झालेली हिंदूंची साडेचार लाख मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याचे नियोजन केंद्र आणि महाराष्ट्रातील हिंदुत्वनिष्ठ सरकारने करावे. सरकारने मंदिरांसाठी ‘सनातन मंडळा’ची स्थापना करून मंदिरे सुरक्षित करावीत.

धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत
राष्ट्र आणि धर्म हितार्थ निर्णय घेणार ! – लोकप्रतिनिधींचे आश्वासन
देश, धर्म आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध लोकप्रतिनिधी हिंदूंसाठी आशास्थान !
असा झाला कार्यक्रम !
शंखनादाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर व्यासपिठावरील भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे मान्यवरांनी पूजन केले. हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मंत्री आणि आमदार यांचा शाल, पुष्पगुच्छ अन् सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
The Mahayuti government is committed to protecting Hindu Temples, the country and Sanatan Hindu Dharma – Assurance by Ministers and MLAs from Maharashtra
Felicitation of Dharma Premi elected representatives by @HinduJagrutiOrg and Maharashtra Mandir Mahasangh pic.twitter.com/hA8YuruPq9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 20, 2024
हिंदुत्वनिष्ठांचे सरकार आल्यामुळे मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करावीत ! – पू. भगीरथी महाराज, गुरुकृपा सेवा संस्थान, नागपूर
देशात पालट होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. सामाजिक माध्यमांतून सनातन आणि संत यांचा सन्मान होत आहे. ५ डिसेंबर या दिवशी झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमाला जाण्याचे मला सौभाग्य मिळाले. यापूर्वी सोहळ्यात संतांना बोलावले जात नव्हते. श्रीरामाचा राज्याभिषेक होत असतांना जसे संतांना बोलावण्यात आले, तसे याही सोहळ्याला येथे बोलावल्यामुळे ‘निश्चितच रामराज्य लवकर येणार आहे’, असे मला वाटते. हिंदुहिताविषयी बोलणारा नव्हे, तर हिंदुहिताचे काम करणारे देशावर राज्य करतील, असा आम्ही निवडणुकीत प्रचार केला आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे मंदिरे सरकारीकरणातून मुक्त झाली पाहिजे, धर्मांतरबंदी कायदा, लव्ह जिहादविरोधी कायदा, गायीचे रक्षण झाले पाहिजे. याविषयी समाज विचारत आहे. हिंदुत्वनिष्ठ सरकार आले आहे, त्यांना सांगायचे आहे की, लवकरात लवकर मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा. धर्मांतरबंदी कायदा बनवून आपला देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करावे.

मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी गौरवोद्गार !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदुत्वासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित केले. त्याप्रमाणे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही धर्मजागृतीचे कार्य करत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते चिकाटीने कार्य करत आहेत. ते ज्यासाठी कार्यरत आहेत, ती हिंदु राष्ट्राची संकल्पना एक दिवस सत्यात उतरेल.
अन्य कार्यक्रमांपेक्षा हिंदुत्वनिष्ठांकडून झालेला सत्कार माझ्यासाठी महत्त्वाचा !
मंत्री झाल्यानंतर माझ्या सत्काराचा हा पहिला कार्यक्रम मी स्वीकारला आहे आणि हा योग्य कार्यक्रम आहे. मंत्री अन्य कार्यक्रमांना जातात; मात्र हिंदुत्वनिष्ठांकडून सत्कार होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असे या वेळी मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले.
समान नागरी कायद्यासारखे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील ! – आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना

लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या निकालानंतर सतर्क होऊन विधानसभा निवडणुकीत हिंदूंनी एकजुटीने मतदान केले. ही एकजूट हिंदूंनी टिकवून ठेवायला हवी. ‘जेथे अल्पसंख्य झाले, तेथे हिंदूंना धोका निर्माण झाला’, ही स्थिती कोणताही राजकीय पक्ष नाकारू शकत नाही. बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करण्यात आले. त्यामुळे भारतात हिंदू अल्पसंख्यांक झाले, तर काय होईल ? याचा विचार करा ! यावर केवळ निवेदन देणे आणि मेणबत्ती मोर्चा काढणे हे उत्तर नाही. हिंदू अल्पसंख्यांक होणार नाहीत, याची दक्षता हिंदूंनी घ्यायला हवी. हिंदू अल्पसंख्यांक होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. यासाठी समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणे आवश्यक आहे. राष्ट्रहितासाठी सरकारला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
चित्रपटसृष्टीतील हिंदु धर्माचा अवमान धर्मनिरपेक्ष देशात कसा चालतो ? – डॉ. मनीषा कायंदे, आमदार, शिवसेना (मुंबई)

हिंदूंच्याच सणांच्या वेळी पर्यावरणाचा र्हास असा अपप्रचार केला जातो. यामध्ये हिंदूही सहभागी असतात. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाला, तर हिंसाचार केला जातो; परंतु चित्रपटसृष्टीमध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा सातत्याने अवमान होतो, तेव्हा धर्मनिरपेक्ष मंडळी गप्प रहातात. हिंदु धर्माचा अवमान धर्मनिरपेक्ष देशात कसा चालतो ? हिंदू स्वत:च्या धर्माचे शिक्षण घेत नसल्यामुळे असे प्रकार चालत आहेत. अन्य धर्मीय स्वत:च्या धर्माविषयी जागरूक असतात; मात्र हिंदू स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतात. याचे कारण हिंदूंना घरामध्ये धर्मशिक्षण मिळत नाही. हिंदु स्त्रियांनी स्वत: धर्मशिक्षण घ्यावे आणि स्वत:च्या पाल्यांनाही धर्मशिक्षण द्यावे, तरच येणारी पिढी धर्माभिमानी होईल.
हिंदूंची येणारी पिढी हिंदु राष्ट्रात श्वास घेईल ! – आमदार प्रताप अडसड, भाजप

अनेकजण राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी समर्पित भावनेने कार्य करत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय कठीण वाटत होता; मात्र हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्यामुळे मला अधिक मताधिक्य प्राप्त करता आले. भारतीय संस्कृतीवर आघात करण्यासाठी विदेशी शक्ती कार्यरत आहेत. हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे. हिंदूंना जागृत करण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून होत आहे. केंद्रात हिंदुत्वनिष्ठ शासन आले नसते, तर श्रीराममंदिर उभारणे, काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हे झाले नसते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ शासन येण्यासाठी हिंदूंनी जागरूक असायला हवे. यासाठी हिंदूंनी राजकीयदृष्ट्या सजग रहाणे आवश्यक आहे. सनातन धर्माची जोपासना करणारे सरकार असेल, तर हिंदुत्वाचे कार्य सुकर होते. हिंदूंची येणारी पिढी हिंदु राष्ट्रात श्वास घेईल !
हिंदुत्वासाठी कार्य करण्याचा मी शब्द देतो ! – आमदार आनंद बोंडालकर, शिवसेना

गाय आपली माता आहे. तिचे रक्षण व्हायला हवे. मंदिरांचे रक्षण करायला हवे. देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करणे हिंदूंचे दायित्व आहे. धर्म टिकला, तर आपण सुरक्षित राहू. त्यामुळे हिंदूंनी समर्पित होऊन धर्मकार्य करण्याची आवश्यकता आहे. हिंदु धर्माचे रक्षण आणि गोहत्या रोखण्यासाठी हिंदूंनी प्राणपणाने कार्य करणे आवश्यक आहे. धर्मकार्यासाठी हिंदूंनी एकत्र यायला हवे.
शालेय पाठ्यक्रमात संतचरित्रांचा समावेश करावा ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शाम मानव आणि ‘चित्रलेखा’ साप्ताहिकाचे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांसारखे लोक देवीदेवतांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करूनही मोकाट आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. हिंदूंना धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था नाही. यासाठी शालेय पाठ्यक्रमात संतचरित्रांचा अंतर्भाव होणे आवश्यक आहे.
उपस्थित मान्यवर !
‘अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासंघा’चे सभापती श्री. श्यामसुंदर सोनी, भाजपचे शहर अध्यक्ष श्री. अनिल शर्मा, ‘लोक जागृती मोर्चा’चे अध्यक्ष अधिवक्ता रमण सेनाड, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे श्री. रामनारायण मिश्र, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे जिल्हा संयोजक श्री. दिलीप कुकडे इत्यादी.
या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सदस्यता नोंदणी अभियाना’चे उद्घाटन उपस्थित मंत्री आणि आमदार यांच्या हस्ते करण्यात आले. आतापर्यंत मंदिर महासंघाशी देशभरातील १५ सहस्र मंदिरे जोडली गेलेली आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण !
कायदेशीर लढा देऊन अमरावती जिल्ह्यातील बळकावण्यात आलेली १ सहस्र ५०० एकरहून अधिक भूमी मंदिरांना पुन्हा प्राप्त करून देणारे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अनुप जयस्वाल यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.