नागपूर दंगलीमागे बांगलादेश आणि मालेगाव येथील संबंध ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे

मुंबई – नागपूर दंगलीसाठी शिवप्रेमींना उत्तरदायी धरणे चुकीचे आहे. ‘नागपूरची दंगल हिंदूंनी घडवली’, असे खोटे कथानक पसरवले जात आहे. मतांसाठी चाललेली ही लाचारी संतापजनक आहे. नागपूर दंगलीमागे बांगलादेश आणि मालेगाव येथील संबंध आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. २६ मार्च या दिवशी अंतिम आठवडा चर्चेला विधान परिषदेत उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी वरील वक्तव्य केले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘‘औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे राज्यातील वातावरण बिघडवत आहेत. मतांसाठी औरंगजेबाचे उदात्तीकरण चालू आहे. देशभक्त मुसलमान औरंगजेबाचे उदात्तीकरण करू शकत नाहीत. औरंगजेब महाराष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी आला होता. त्याचे उदात्तीकरण हा देशद्रोह आहे. जे सामाजिक तेढ निर्माण करतील, त्यांना दयामाया दाखवली जाणार नाही.’’

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’विषयी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या वेळी सर्व आश्वासने पूर्ण करू. आश्वासने पूर्ण झाल्याविना स्वस्त बसणार नाही. आमचे आश्वासन म्हणजे काळ्या दगडावरील भगवी रेख आहे. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या अंतर्गत सरकारने घोषित केले त्याप्रमाणे पैसे मिळतील.’’

राज्यातील बसस्थानक विमानतळांप्रमाणे व्हायला हवेत !

एस्.टी. बस राज्यातील गावागावांत पोचते. ती गरिबांची जीवनवाहिनी आहे. राज्यातील सर्व विश्रांतीगृह चांगले असायला हवेत. राज्यातील बसस्थानकांवरील विश्रांतीगृहे चांगली असायला हवीत. ज्याप्रमाणे विमानतळ आहेत, त्याप्रमाणे बसस्थानके असायला हवीत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.