मुंबई – राज्य परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिलेले सामाजिक संदेश मराठी भाषेत असले पाहिजेत. त्यासाठी येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश, तसेच इतर महत्त्वाची विज्ञापने आणि प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहिण्याविषयीची कार्यवाही चालू करावी, असे निर्देश परिवहन आयुक्त यांना दिल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची मराठी ही अधिकृत राज्यभाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे मराठी भाषिक आहेत. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. सहाजिकच मराठी भाषेचे संवर्धन करणे, हे शासनाचे नैतिक दायित्व आहे. तथापि राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, विज्ञापने (जाहिराती) आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदी किंवा अन्य भाषांमध्ये असते. (उदाहरणार्थ : ‘बेटी बचाव… बेटी पढाव’) त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसार यांवर बंधने येतात. यापुढे असे संदेश, विज्ञापने किंवा प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास (उदाहरणार्थ : मुलगी वाचवा…. मुलगी शिकवा !) महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार अन् प्रसार होईल, तसेच मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल.