मालवण बसस्थानकाच्या जुन्या इमारतीच्या छपराचा काही भाग कोसळून महिला प्रवासी घायाळ 

मालवण – येथील बसस्थानकाच्या जुन्या इमारतीच्या ‘स्लॅब’चा (छपराचा) काही भाग डोक्यावर पडल्याने एक महिला प्रवासी महिला गंभीर घायाळ झाली. ही घटना २६ मार्चला सकाळी घडली असून घायाळ महिलेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. जुन्या इमारतीचा ‘स्लॅब’ धोकादायक बनला असतांनाही त्या दृष्टीने एस्.टी. प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

येथील बसस्थानकाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. काही वर्षांपूर्वी या इमारतीचा ‘स्लॅब’ कोसळून प्रवासी घायाळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या. सद्य:स्थितीत बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम चालू आहे. त्यामुळे प्रवासी बसस्थानकाच्या जुन्या इमारतीतच बसची वाट पहात बसतात. २६ मार्चला सकाळी बेळगाव येथून एक दांपत्य मालवण येथे आले. तेथून आचरा येथे जाण्यासाठी बसची वाट पहात बसस्थानकात उभे होते. त्या वेळी अचानक ‘स्लॅब’चा काही भाग महिलेच्या डोक्यावर पडून ती घायाळ झाली. इमारत जुनी झाल्याने बसस्थानकात बसची वाट पहाणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एस्.टी. प्रशासनाने उपाययोजना न केल्याने  प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.