पानिपतची लढाई मराठ्यांच्या पराभवाची नव्हे, शौर्याची लढाई ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगत आव्हाडांची केली बोलती बंद

देवेंद्र फडणवीस

मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – पानिपतची लढाई ही मराठ्यांच्या पराभवाची नव्हे, तर शौर्याची लढाई आहे. या ऐतिहासिक लढाईतील त्याग आणि शौर्य यांची आठवण म्हणून पानिपतच्या काला आंब परिसरात भव्य स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याला शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला; मात्र मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगत आव्हाडांची बोलती बंद केली.

‘पानिपतचे स्मारक म्हणजे पराभवाची आठवण होईल’, असा आक्षेप सदस्य आव्हाड यांनी घेतला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पानिपतच्या लढाईत त्या दिवशी पराभव झाल्याचे शल्य मनात असले, तरी आम्ही कधीच हा पराभव मानत नाही. या लढाईतूनच ऊर्जा घेऊन महादजी शिंदे यांनी देहली जिंकली आणि छत्रपती शिवरायांचा भगवा देशभर फडकावला. यासाठीच पानिपतचे स्मारक हे पराभवाचे नव्हे, तर आमच्या शौर्याचे प्रतीक असेल. अब्दालीशी मराठ्यांचा थेट संबंध नव्हता; पण देहलीचा बादशहा स्वतः साहाय्यासाठी मराठ्यांकडे आला. मराठ्यांनी देहली जिंकली. त्यावरच अब्दालीने पत्र पाठवून ‘पंजाब, सिंध, बलुचिस्तान माझे, बाकी भारत तुमचा’ असे मान्य करण्याची मागणी केली; पण मराठ्यांनी स्पष्ट उत्तर दिले एक इंचही भूमी देणार नाही. यासाठीच पानिपतची लढाई झाली. ही लढाई मराठ्यांनी भारतासाठी लढली.