प्रत्येकी १ झाड तोडल्याच्या प्रकरणी १ लाख रुपयांचा दंड ! – सर्वाेच्च न्यायालय

झाड तोडणे मनुष्याच्या हत्येपेक्षा वाईट असल्याचे न्यायालयाची स्पष्टोक्ती

सर्वाेच्च न्यायालय

नवी देहली : पर्यावरणाची हानी करणार्‍यांवर दया दाखवली जाऊ नये. मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे हे मनुष्याच्या हत्येपेक्षाही वाईट आहे, असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने बेकायदेशीररित्या तोडल्या जाणार्‍या प्रत्येक झाडासाठी १ लाख रुपये दंड आकारण्यास मान्यता दिली आहे. ‘संबंधित प्राधिकरण किंवा संस्था यांची अनुमती घेतल्याविना कोणतीही व्यक्ती झाड तोडू शकत नाही’, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. एका व्यक्तीने झाडे तोडल्याबद्दलच्या प्रकरणावर न्यायालयाने हा आदेश दिला.

१. गेल्या वर्षी शिवशंकर अग्रवाल यांनी तोडलेल्या ४५४ झाडांसाठी प्रति झाड १ लाख रुपये (एकूण ४ कोटी ५४ कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला होता, असा केंद्रीय सक्षम समितीचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला.

२. अग्रवाल यांचे अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाने सांगितले की, त्यांच्या अशिलाने चूक मान्य केली आहे आणि क्षमाही मागितली आहे. त्यामुळे दंडाची रक्कम अल्प करण्यात यावी. तसेच अग्रवाल यांना केवळ त्या भूमीवरच नव्हे, तर जवळपासच्या ठिकाणीही झाडे लावण्याची अनुमती देण्यात यावी.

३. यावर न्यायालयाने दंडाची रक्कम अल्प करण्यास नकार दिला. जवळपासच्या भागांत झाडे लावण्याची अनुमती दिली.

संपादकीय भूमिका

दंड भरून अशांना सोडू नये, तर त्यांना कारागृहात शिक्षा भोगण्यास पाठवावे !