विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची एकमताने निवड !

अण्णा बनसोडे

मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे, हे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे. विधानसभेचे सदस्य अण्णा बनसोडे उपाध्यक्ष झाले, ही घटना केवळ त्यांचा गौरव नसून राज्यातील १३ कोटी जनतेचा अभिमान आहे. राज्यघटनेने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळेच आज सामान्य माणूसही उच्च पदावर पोचू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची २६ मार्चला एकमताने निवड केली. या निवडीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर प्रस्ताव मांडला, त्या वेळी ते बोलत होते. सदस्य अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, ते जनतेच्या विश्वासावर पुढे आले असून त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला निश्चितच लाभ होईल. सर्वसामान्यांना न्याय देणार्‍या या सभागृहात सामान्य कार्यकर्त्याची उपाध्यक्षपदी निवड झाली याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. उपाध्यक्ष पदावरून अण्णा बनसोडे सभागृहातील सदस्याच्या प्रश्नातून राज्यातील जनतेला न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.