दिशा सालियान हत्या प्रकरण

मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – दिशा सालियान हत्या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी २५ मार्चला पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तिच्या वडिलांनी दिशाच्या हत्येमध्ये विधानसभेचे सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्याची तक्रार दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कृषीमंत्री धनजंय मुंढे यांना त्यागपत्र द्यावे लागले आहे. त्यामुळे दिशाच्या हत्येत आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे नैतिकता म्हणून त्यागपत्र देणार का ? असा प्रश्न शिवसेनेचे सदस्य संजय गायकवाड यांनी २६ मार्च या दिवशी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केला.
‘एस्.आय.टी.’ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करावी ! – राम कदम, आमदार, भाजप
भाजपचे आमदार राम कदम म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणात अजूनही विशेष अन्वेषण पथकाद्वारे (एस्.आय.टी.) चौकशी चालू आहे. ही चौकशी होत असतांना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ठाकरे सरकारची भूमिका काय आहे ? यावर चौकशी झाली पाहिजे. दिशा सालियान प्रकरणातील ‘एस्.आय.टी.’ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करावी. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहारचे पोलीस येथे आल्यानंतर त्यांना कुणी अडवले ?
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या चौकशी अहवालातून सत्य समोर ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, दिशा सालियानच्या वडिलांनी स्वतः मुंबई येथील पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणात माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला. या प्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही. या प्रकरणाची विशेष अन्वेषण पथकाच्या वतीने (एस्.आय.टी.च्या) चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाची तिच्या वडिलांनी पोलिसांना अधिकची माहिती दिली आहे. त्याविषयी पोलीस आयुक्तांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. |
अज्ञानी लोकांनी बोलू नये !
उद्धव ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी वारंवार उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्या नावाची अपकीर्ती करण्यात येत आहे. तरी ते रेकॉर्डवरून काढून टाकावे, अशी मागणी केली. याला अनुसरून भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले की, ‘सीबीआय’ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी जो अहवाल दिला आहे, तो न्यायालयाने अजून स्वीकारलेला नाही. देहली येथील आरुषी तलवार हत्या खटल्यातही असेच झाले आणि न्यायालयाने तो नाकारला. पुढे तो खटला पुन्हा चालू होऊन आरोपींना शिक्षा झाली. अज्ञानी लोकांनी याच्यावर बोलू नये.