अकोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र ‘स्टेटस’वर ठेवल्याने पोलीस अधिकार्‍याची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण !

(स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण.)

अकोला – येथील बाळापूर तालुक्यातील लोहारा गावात प्रशांत ढेले आणि आनंद इंगळे या २ आदिवासी विद्यार्थ्यांना २१ मार्च या दिवशी साहाय्यक पोलीस निरीक्षकाने बेदम मारहाण केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तलवार धरलेले चित्र व्हॉट्सॲपवर ठेवले होते. या चित्राविषयी उरला पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बोलावले आणि त्यांना काठीने बेदम मारहाण केली. ज्यामुळे विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर लगेचच घायाळ विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या घटनेची माहिती मिळताच लोहारा गावातील ५० हून अधिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ढोले यांच्यावर कडक कारवाई करण्याची आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करत तक्रार प्रविष्ट केली आहे. या घटनेविषयी सामाजिक माध्यमांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत.

सकल हिंदु समाजानेही पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. तिथे उपस्थित असलेले हिंदु कार्यकर्ते रजित गावंडे म्हणाले, ‘‘पोलीस अधिकारी हिंदु तरुणांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांना इतक्या क्रूरपणे मारहाण करत आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे. जर साहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले यांच्यात इतके धाडस असेल, तर ते त्यांच्या परिसरात चालू असलेली पशूवधगृहे बंद करण्याचे धाडस दाखवणार का ?’’

संपादकीय भूमिका :

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र ‘स्टेटस’वर ठेवल्याने विद्यार्थ्यांना मारहाण करणारे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ? अशा हिंदुद्वेषी पोलिसांवर कठोर कारवाई करायला हवी !
  • शिवरायांचे चित्र ‘स्टेटस’वर ठेवणार्‍या विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा आदेश पोलिसांना कुणी दिला ? हेही शोधले पाहिजे !