कोणतीही करवाढ नसलेले कोल्हापूर महानगरपालिकेचे ७०६ कोटी रुपये जमेचे अंदाजपत्रक सादर !

कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकाची माहिती देतांना प्रशासक के. मंजूलक्ष्मी (डावीकडे) यांसह अन्य अधिकारी

येणार्‍या आर्थिक वर्षात अतिक्रमणाची मोठी मोहीम ! – महापालिका प्रशासक

आता शहरातील काही रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यास आम्ही प्रारंभ केला आहे. येणार्‍या आर्थिक वर्षात आम्ही शहरात सर्वत्र अतिक्रमणाची मोठी आणि व्यापक मोहीम हाती घेणार आहोत, अशी माहिती प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

कोल्हापूर, २६ मार्च (वार्ता.) – घरपट्टी, पाणीपट्टी यांमध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेले ७०६ कोटी ६४ लाख रुपये जमेचे कोल्हापूर महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यात प्रामख्याने महापालिका महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर आणि व्ययामध्ये वित्तीय शिस्त, आरोग्य-स्वच्छता, शिक्षण कार्यक्रमांची काटेकोर कार्यवाही, महिला, दिव्यांग कल्याणकारी योजनांवर भर, परिवहन सेवा सक्षमीकरण यांसह नागरिकांना घरबसल्या जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसह सर्व दाखले मिळण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

१. महापालिकेच्या परिवहन विभागासाठी १०० ई-बस गाड्या प्रस्तावित असून आणखी ५० गाड्या आम्हाला मिळतील, अशी आशा आहे.

२. शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरात सरस्वती टॉकीज, गोकुळ उपाहारगृह, कावळा नाका, रंकाळा परिसर यांसह अन्य ठिकाणी जागा विकसित करण्यात येत आहेत.

३. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण अल्प करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सदर योजना ही वर्ष २०२९ सालापासून चालू झाली असून सदर योजनेमध्ये आतापर्यंत २४ कोटी ११ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. याअंतर्गत हवेतील धुलीकण अल्प होण्यासाठी नवीन रस्ते करणे यांसह अन्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

४. कोल्हापूर महापालिका लवकरच स्वत:च्या मालकीचा पेट्रोल-डिझेल पंप बांधण्याचा विचार करत असून त्यासाठी विविध राष्ट्रीय पेट्रोकेमिकल आस्थापनांशी चर्चा चालू आहे.