शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ असणार्‍या पनवेल, जिल्हा रायगड येथील श्रीमती कुंदा मधुकर मोहिते (वय ६४ वर्षे) !

 ‘वर्ष २०२० पासून श्रीमती कुंदा मधुकर मोहिते (वय ६४ वर्षे) या सनातन संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. त्या सेवा अन् साधना करत आहेत. मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीमती कुंदा मधुकर मोहिते

१. जीवनात अनेक संकटे येणे

श्रीमती कुंदा मधुकर मोहिते यांचे बालपण आनंदात गेले. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. वर्ष २००८ ते २०१२ मध्ये त्यांचे यजमान (श्री. मधुकर मोहिते) गंभीर आजारी होते. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून कुंदाताईंना नोकरी सोडून घरी थांबावे लागले. वर्ष २०१४ मध्ये त्यांच्या यजमानांचे (वय ६० वर्षे) निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा मंदार मोहिते याला दारू पिण्याचे व्यसन लागले. त्यांच्या मुलाच्या वैवाहिक अडचणी वाढल्या. त्यामुळे कुंदाताईंना न्यायालयीन खटल्यांनाही तोंड द्यावे लागले. २१.३.२०२१ या दिवशी त्यांच्या मुलाचे (वय ३७ वर्षे) निधन झाले. त्यांच्या जीवनात अशी अनेक संकटे आली.

२. सनातन संस्थेच्या संपर्कात येऊन साधना चालू करणे आणि जीवनातील दुःखदायक संकटांतून बाहेर पडता येणे

श्रीमती सुनीता निमकर

पूर्वी कुंदाताई दत्तगुरूंचा नामजप करत असत. वर्ष २०२० मध्ये पनवेल येथील साधिका सौ. कमल रसाळ यांनी कुंदाताईंना गुरुपौर्णिमेविषयी माहिती सांगून साधना करण्याचे महत्त्व सांगितले. तेव्हा ताईंनी गुरुपौर्णिमेसाठी अर्पण दिले आणि कुलदेवतेचा नामजपही चालू केला. त्यांनी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने विकत घेतली. त्यानंतर त्या सनातनच्या ऑनलाईन सत्संगात सहभागी झाल्या. त्यांनी साधना चालू केली आणि साधनेच्या बळावर त्या जीवनातील दुःखदायक संकटांतून बाहेर पडू शकल्या.

३. साधना केल्यामुळे मनमोकळेपणाने बोलता येणे आणि सत्संगाची गोडी लागून आनंद मिळणे

आरंभी ताईंचा स्वभाव अबोल होता; परंतु साधना चालू केल्यावर त्यांच्यामध्ये पालट झाले आणि त्या मनमोकळेपणाने बोलू लागल्या. त्यांनी सत्संगाच्या माध्यमातून स्वतःच्या मनातील शंकांचे निरसन करून घेतले. त्यांना सत्संगाची गोडी लागली आणि त्यातून त्यांना आनंद मिळू लागला.

४. श्रीमती कुंदा मोहिते यांची गुणवैशिष्ट्ये 

४ अ. ऐकण्याची वृत्ती : कुंदाताई सत्संगामध्ये सांगितलेली सर्व सूत्रे तंतोतंत कृतीत आणण्याचा प्रयत्न करतात, उदा. नामस्मरण करणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे.

४ आ. सकारात्मकता : ताईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पुष्कळ सकारात्मक आहेत. त्या कधीही कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणत नाहीत. जर एखादी सेवा नवीन असेल, तर त्या विचारून आणि शिकण्याच्या स्थितीत राहून ती सेवा करण्याचा प्रयत्न करतात.

४ इ. शिकण्याची वृत्ती : ‘शिकायला मिळालेले सूत्र कृतीत आणणे’, हा ताईंचा एक मोठा गुण आहे. त्या नवीन सेवा शिकून घेतात. त्या स्वतःकडून ‘सेवेत काही चूक झाली का ?’ याविषयी विचारून घेतात. ताई इतरांचे स्वभावदोष न पहाता त्यांच्यातील गुण शिकण्याचा प्रयत्न करतात.

४ ई. साधकांना आधार वाटणे : त्यांच्याकडे साधकांचे येणे-जाणे असते. त्या साधकांना चहा आणि न्याहारी देतात. एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्या घरी साधकांच्या निवासाची व्यवस्था केली होती. ताईंमध्ये साधकत्व असल्याने त्या नेहमीच पुढाकार घेऊन सेवा करतात. त्यामुळे आता साधकांना ताईंचा आधार वाटतो.

५. समष्टी सेवेची तळमळ

अ. ताईंचे अक्षर चांगले आहे. त्यांनी सहसाधिकेसमवेत फलक प्रसिद्धीची (राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील माहिती फलकावर लिहिणे) सेवा चालू केली. फलकसंख्या अपुरी असल्याने काही वेळा त्या फलकांवर लिहिण्याची माहिती कागदावर लिहितात आणि त्याच्या २० – २५ झेरॉक्स प्रती काढून त्या ठिकठिकाणी लावतात.

आ. ताईंनी सत्संगात सांगितल्याप्रमाणे सनातनच्या ग्रंथांचा (उदा. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या संदर्भातील ग्रंथांचा) अभ्यास केला. त्या ते ग्रंथ घरात पटलावर मांडून ठेवायच्या. त्यामुळे त्यांच्याकडे येणारे नातेवाईक ग्रंथ बघून ते विकत घेऊ लागले. ‘श्रीमती कुंदाताई त्यांच्या आयुष्यातील एवढे मोठे दुःख पचवून साधनेला लागल्या’, हे पाहून नातेवाइकांनासुद्धा आनंद झाला आहे.

इ. ताईंनी त्यांच्या नातेवाइकांना सनातनचे ग्रंथ आणि पंचांग वितरण करून प्रसार केला. त्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत सहभागी होतात. ताईंच्या घरामध्ये प्रसार साहित्य ठेवले जाते. त्यांनी ग्रंथप्रदर्शन कक्षाचे दायित्वही घेतले आहे.

ई. ताईंनी त्यांचे भाऊ, बहीण आणि अन्य नातेवाईक यांना सनातनच्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडले होते. आता त्या स्वतः २ ‘ऑनलाईन’ सत्संग घेत आहेत.’

– श्रीमती सुनीता निमकर (वय ७१ वर्षे), पनवेल, जिल्हा रायगड. (२८.११.२०२४)