|
सावंतवाडी – तालुक्यातील चौकुळ-इसापूर जंगलात शिकारीसाठी फिरणार्या ४ जणांना वन विभागाच्या पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पथकावर गोळीबार करून पसार होण्याचा प्रयत्न केला; तरीही पथकाने या आक्रमणाला प्रतिकार करत या ४ जणांना अटक केली. त्यांच्याकडून शिकार केलेला ससा, काडतुसे, बंदूक आणि ३ दुचाकी, असे साहित्य कह्यात घेतले. ही कारवाई २५ मार्चच्या रात्री चौकुळ येथील जंगलात करण्यात आली. या ४ जणांना २६ मार्च या दिवशी न्यायालयाने २८ मार्चपर्यंत वन कोठडी सुनावली.
आंबोली जंगलात काही शिकारी फिरत असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना मिळाली. त्यानुसार वन विभागाचे पथक गस्त घालत असतांना इसापूर येथील जंगलात ४ जण संशयास्पदरित्या फिरतांना दिसले. पथकाने हटकले असता त्यांनी पथकावर गोळीबार करून पसार होण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही पथकाने त्यांना कह्यात घेतले.
दशरथ बाबूराव राऊळ (रहाणार माडखोल), प्रशांत सदानंद कुबल (रहाणार कुडाळ), अमोल नामदेव गावडे (रहाणार खासकीलवाडी) आणि सखाराम चंद्रकांत राऊळ (रहाणार माडखोल) अशी ४ संशयितांची नावे आहेत. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार आणि शासकीय कर्मचार्यांवर जीवघेणे आक्रमण करून सरकारी कामात अडथळा केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.