जॉनरोज यांची वादग्रस्त भूमिका !

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आय.एम्.ए.) आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्यातील संघर्षाचा मोठा लाभ देशाला होत आहे, तो म्हणजे ज्या भारतियांचा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजे सरकारी संस्थाच आहे’, असा समज झाला होता, त्यांना यातून खरे-खोटे कळले. एवढेच नाही, तर वेगवेगळ्या माध्यमांतून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (‘आय.एम्.ए.’च्या) कारवायाही समोर येत आहेत. तिचे अध्यक्ष डॉ. जे.ए. जयलाल यांच्याही वादग्रस्त भूमिका जगासमोर येत आहेत. समस्त आयुर्वेदप्रेमीही हे घडण्याच्या प्रतीक्षेतच होते. त्यामुळेच आय.एम्.ए.च्या मक्तेदारीविरोधात लढण्यासाठी ‘नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’च्या (‘निमा’च्या) ७ कोटी ८० लाख आयुर्वेदीय वैद्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे आय.एम्.ए.च्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण स्वतःच्याच अंगावर शेकू लागल्यामुळे आता आय.एम्.ए.ने सावध पवित्रा घेऊन योगऋषी रामदेवबाबा यांना विधान मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

(उजवीकडे) योगऋषी रामदेवबाबा

आयुर्वेदद्वेष्टी आय.एम्.ए. !

योगऋषी रामदेवबाबांवर १ सहस्र कोटी रुपयांचा मानहानीचा दावा लावणार्‍या याच आय.एम्.ए.ने पतंजलीच्या ‘कोरोनील’ औषधावर आक्षेप घेतला होता. नंतरच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून कोरोनीलची विक्री चालू असली, तरी कोरोनावरील ते आयुर्वेदाचे प्रभावी औषध ठरले असते. कोरोनील आणि अन्य आयुर्वेदाच्या औषधांना विरोध करणारी आय.एम्.ए. स्वतः मात्र भिंतीला लावायचा रंगही ‘अ‍ॅन्टीबॅक्टेरियल’ (जिवाणूरोधक) असल्याचे प्रमाणपत्र वाटत आहे. भिंतींचा रंग, अंगाचा साबण, एल्.ई.डी. दिवा, पाणी शुद्धीकरण यंत्र (वॉटर प्युरिफायर) यांच्या वापरामुळे किटाणू अन् विषाणू ९९.९९ टक्के नष्ट होतात, यांसारखे दावे अनेक विदेशी आस्थापने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या नावे करत असतात. कोरोना महामारीच्या काळात अशा अंधश्रद्धा पसरवून लोकांचे आरोग्य धोक्यात घालणे वैद्यकशास्त्राच्या कोणत्या नीती-नियमांत बसते ? या आस्थापनांना असे प्रमाणित करण्यासाठी आय.एम्.ए.ने कोणते साक्षी-पुरावे गोळा केले आहेत ? विशिष्ट रक्कम घेऊन अशी प्रमाणपत्रे वाटली जात असल्याचे दावे केले जातात. जर हे खरे आहे, तर ‘अशा कृत्रिम उपकरणांची आवश्यकताच लागणार नाही’, अशी जीवनशैली विकसित करणार्‍या आयुर्वेदाला आय.एम्.ए. विरोध का करते ? ते लक्षात येईल. वैद्यांना शस्त्रक्रिया करण्याची अनुमती देणारा शासनाचा निर्णय झाला, तेव्हा त्याला कडाडून विरोध करणारी आय.एम्.ए.च होती ! आय.एम्.ए.चे मत म्हणजे संपूर्ण वैद्यकशास्त्राचे मत असल्याप्रमाणे त्याची नोंदही घेतली गेली होती.

जॉनरोज यांचे बेगडी रुग्णप्रेम !

(डावीकडे) आय.एम्.ए.चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज जयलाल

आधुनिक वैद्यांच्या जिवाची काळजी करणार्‍या आणि त्यांच्या बलीदानाचे मोल करण्याची मागणी करणार्‍या जॉनरोज यांनी कोरोनाच्या काळातच उपोषणाला जाण्याची धमकी सरकारला दिली होती, हे अजून विसरता आलेले नाही. जागतिक महामारीच्या काळात शासनाची धोरणे जनतेपर्यंत न पोचवता जॉनरोज त्यांच्या ट्विटर हँडलवरून सरकारची खिल्ली उडवतांना दिसून आले. भाजपच्या अनेक नेत्यांची विपरित व्यंगचित्रे प्रसिद्ध करून कोणती आरोग्यविषयक जागृती आय.एम्.ए. आणि जॉनरोज जयलाल करत होते ? हिंसक आणि देशविरोधी वळण घेतलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी विदेशी पर्यावरणरक्षक ग्रेटा थनबर्ग हिला आय.एम्.ए.चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज जयलाल यांनी पाठिंबा दिला होता.

आय.एम्.ए.ची स्थापना वर्ष १९२० मध्ये ब्रिटिशांनी केली होती. तेव्हाच्या त्यांच्या उद्देशाप्रमाणे ती अजूनही भारतियांचे ख्रिस्तीकरण करत आहे. जयलाल हे नाव हिंदु वाटत असले, तरी त्यांचे पहिले नाव जॉनरोज आहे, हे विसरता येणार नाही. एकीकडे ‘योगऋषी रामदेवबाबा यांनी कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून लढणार्‍या आधुनिक वैद्यांचा अवमान केला आहे’, असे म्हणणारे डॉ. जॉनरोज अन्य एका मुलाखतीत ‘येशूने सर्व लक्ष भारतावर एकवटल्यामुळे चांगले होत आहे’, असे म्हटले होते. ‘धर्मनिरपेक्ष संस्था, मिशनरी संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयांत काम करण्यासाठी अधिकाधिक ख्रिस्ती आधुनिक वैद्यांची आवश्यकता आहे; जेणेकरून ते ख्रिस्ती पद्धतीने रुग्णांवर उपचार करू शकतील’, या जॉनरोज यांच्या वक्तव्यातून त्यांचा उद्देश स्पष्ट होतो. जॉनरोज यांचा धर्मांतराचा उद्देश काही लपून राहिलेला नाही. गेले वर्षभर देश कोरोनाशी झुंजत असतांना जॉनरोज यांचे मनसुबे काय होते ? हेच यातून स्पष्ट होते. ब्रिटिशांनी ज्या ज्या संघटना, व्यवस्था आपल्याला दिल्या, त्यांनी स्वातंत्र्यानंतरही कधी भारतियत्वाचा पुरस्कार केला नाही. आताही जॉनरोज आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आदी वैद्यकशाखांना जाणीवपूर्वक विरोध करत आहेत. अर्थात् तिच्या शापाने या वैद्यकशाखा काही खुंटलेल्या नाहीत. अ‍ॅलोपॅथीचे दुष्परिणाम लक्षात येऊन बहुतांश लोकांनी आता या वैद्यकशाखांना प्राधान्य दिले आहे.

प्रत्येक वैद्यकशाखेच्या काही मर्यादा असणारच आहेत. तरीही गेले वर्षभर आयुर्वेदाला जाणीवपूर्वक डावलून केवळ अ‍ॅलोपॅथीच्या औषधांद्वारे कोरोनावर उपचार करण्याचा जो अट्टाहास चालू आहे, तो पहाता ही वेळ येणारच होती. अ‍ॅलोपॅथीमधीलही उपचारांतूनही प्लाझ्मा थेरपी आता वगळण्यात आली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचेही प्रचंड दुष्परिणाम पहाता आधुनिक वैद्य साशंक आहेत. त्या क्षेत्रातही प्रयोगच चालू आहेत. तेच प्रयोग आयुर्वेदाला करू न देण्यामागे सहस्रो कोटी रुपयांची अ‍ॅलोपॅथी औषधांची बाजारपेठ कारणीभूत आहे, ही भारतभरातील वैद्यांची खंत आहे. जॉनरोज यांच्याकडून होणार्‍या आयुर्वेद विरोधाला हिंदुद्वेषाचा दर्प आहे. ‘सरकारला संस्कृत भाषेवर आधारित औषधप्रणाली बनवायची आहे’, असे म्हणून ते हिंदुत्व, संस्कृत भाषा आणि आयुर्वेद यांचा अपमान करतात. देश इतक्या कठीण स्थितीतून जात आहे की, सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !