Missionaries Conversion In MP School : मांडला (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती शाळेतील अनुसूचित जातीतील मुलांचे धर्मांतर !

  • मध्यप्रदेश बाल संरक्षण आयोगाच्या अन्वेषणात उघड

  • शाळेचे वसतीगृहच अवैध

मांडला (मध्यप्रदेश) – येथील घुठास गावात ‘साइन फॉर इंडिया’ नावाची एक शाळा असून तिच्या वसतीगृहात रहाणार्‍या १५ मुली आणि ३३ मुले यांना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करण्यात आले आहे. या शाळेला वसतीगृह चालवण्याची अनुमतीही नाही.

मध्यप्रदेश बाल संरक्षण आयोगाच्या अन्वेषणात दिसून आले की, या मुलांचा बुद्धीभेद  करून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. ही शाळा ओडिशातील ज्योती राज चालवत आहे. आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि सर्व माहिती भोपाळ मुख्यालय आणि प्रशासन यांना कारवाईसाठी पाठवली आहे.

मुले डॉक्टर आणि इंजिनियर ऐवजी पाद्री बनण्याविषयी बोलत होते !

बाल संरक्षण आयोगाचे सदस्य ओंकार सिंग यांनी सांगितले की, ही ४८ मुले ओडिशा राज्यातील अनुपपूर येथील दमोह आणि आसपासच्या भागातील आहेत. जेव्हा आमच्या पथकाने मुलांशी चर्चा केली, तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या. डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याऐवजी मुले पाद्री आणि नन बनण्याविषयी बोलत होती. मुलांनी स्वतः सांगितले की, त्यांना ख्रिस्ती धर्मात समाविष्ट होण्यास सांगितले गेले होते. त्यांचा पूर्णपणे बुद्धीभेद करण्यात आला होता. शाळेत बायबलसह अनेक धार्मिक पुस्तकेदेखील सापडली, जी तेथे धार्मिक उपक्रम चालू असल्याचा पुरावा होती.

शाळेत बायबलसह प्रार्थना !

पोलीस अधिकारी के.के. उपाध्याय म्हणाले की, शाळेत काहीतरी गडबड चालू आहे, असा आधीच संशय होता. जेव्हा आयोगाचे पथक आले, तेव्हा त्यांना मुले बायबल घेऊन प्रार्थना कक्षात जातांना दिसली. मुलांनी सांगितले की, ते प्रतिदिन संध्याकाळी ६:३० वाजता ख्रिस्ती प्रार्थना करतात. यापूर्वी ते अन्य धर्माचे पालन करत असत.

मुलींच्या प्रसाधनगृहांत बसवण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे  !

बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या डॉ. निवेदिता शर्मा म्हणाल्या की, शाळेच्या कागदपत्रांमध्ये मुलांचा धर्म हिंदु आणि जात गोंड, असे लिहिले होते; परंतु वसतीगृहाच्या नोंदींमध्ये त्यांचा ख्रिस्ती म्हणून उल्लेख होता. मुलांची पूर्ण कागदपत्रेही सापडली नाहीत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वसतीगृहातील मुलींच्या प्रसाधनगृहामध्ये कॅमेरे बसवण्यात आले होते. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.

मांडलातील बहुतेक शाळांची स्थिती सारखीच !

मांडला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तारेंद्र चौरसिया यांनी सांगितले की, मुलांच्या मनगटावरील लाल दोरा, कपाळावरचा टिळा गायब झाला आहे. हिंदु चिन्हे पुसून टाकण्यात आली आहेत. येथे आदिवासी मुलांसमवेतच बैगा जमातीच्या मुलांचेही धर्मांतर करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या पालकांच्या अनुमतीविना प्रार्थना करायला लावली जात असून त्यांच्या शाळेच्या अर्जामध्ये ख्रिस्ती धर्मदेखील लिहिला जातो. जवळजवळ सर्व शाळांमध्ये अशीच प्रकरणे समोर येत आहेत.

ख्रिस्ती मिशनर्‍यांना होणार्‍या अर्थपुरवठ्याचा शोध घेण्याची मागणी !

जेमतेम १०० कुटुंबे असलेल्या या मागासलेल्या गावात ख्रिस्ती मिशनरी कोट्यवधी रुपये खर्च करून शाळा बांधत असून तेथे मुलांना नाममात्र शुल्कात शिकवले जात आहे, हे आश्चर्यकारक आहे. यामागील हेतू काय आहे आणि या कामासाठी कोण पैसे देत आहे ?, याची चौकशी करणे महत्त्वाचे आहे, अशी मागणी केली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याची केवळ चर्चा जरी झाली, तरी ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, अशी ओरड करणारे पुरोगामी, सर्वधर्म समभाववाले आता ‘शिक्षणाचे ख्रिस्तीकरण होत आहे’, असे म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • देशात कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे फावले आहे. कायदा करण्याची हिंदूंची मागणी असतांना अद्यापही तो झाला नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही !