संपादकीय : अश्लीलतेला विनोदाची झालर !

विनोदी अभिनेत्री स्वाती सचदेवा

ही दिवसांपूर्वी यू ट्यूबर रणवीर अलाहबादिया यांनी एका कार्यक्रमात आई-वडिलांविषयी अश्लील विनोद केले होते. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका  झाली. त्यावर गुन्हे नोंद झाले, सर्वाेच्च न्यायालयात खटले प्रविष्ट झाले आणि त्यांच्या कार्यक्रमावर तात्कालिक बंदी घालण्यात आली. त्यांना समज देऊन त्यांचे कार्यक्रम पुन्हा चालू करण्यात आले. आता पुन्हा एका कॉमेडियन (विनोद करणार्‍या) मुलीने आईविषयी अश्लील विनोद केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात खासगी गोष्टींविषयी आणि तेही स्वत:च्या आईविषयी मुलगी एवढ्या खालच्या स्तराचा विनोद कसा करू शकते ? असे वाटेल किंवा तशी कल्पनाही करता येणार नाही; मात्र या मुलीने अश्लील विनोद केल्यामुळे सामाजिक माध्यमांमध्ये तिच्यावर टीका चालू झाली आहे. यापुढे कुणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करील, कुणी न्यायालयात खटला प्रविष्ट करील, काही दिवस चर्चा होईल आणि पुन्हा विषय शांत होईल; मात्र यातून जे मूळ सूत्र आहे अश्लील विनोदाचे, त्यावर कसा चाप बसेल ? ‘अतिशय खासगी गोष्टी विनोदाचा भाग कशा बनतात ? विनोद करणार्‍या या तरुणांची संवेदनशीलता मरून गेली आहे का ?’, असाही प्रश्न पडतो. संवेदनशीलता न दाखवणारे अन्य वेळी कसे आचरण करत असतील ?

अश्लील विनोद करणे, हे आता रूढ झाले आहे. ‘स्टँडअप कॉमेडियन’ (एकट्याने विनोद करणारा कलाकार) हे जे काही नवीन ‘फॅड’ आहे, त्यामध्ये जे विनोद करण्यात येतात, ते एरव्हीही कोणतेही कुटुंब एकत्र ऐकू शकणार नाहीत, असेच बर्‍यापैकी असतात. मुलामुलींतील संबंध, महाविद्यालय, प्रेमप्रकरण, चित्रपट इत्यादी विषयांवरील विनोद हे खालचा स्तर गाठणारे असतात. काही विषयांची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. यातील बहुतांश कलाकार हे तरुण वयोगटातील असल्याने ते या विषयांवर विनोद सादर करतात आणि ऐकणारा वर्गही युवा, तरुण वयोगटातील असल्याने त्यांचा या विनोदांना पुष्कळ प्रतिसाद मिळतो. हे विनोद सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केले जातात आणि त्यावर अधिक ‘व्ह्यूज’ (दर्शकसंख्या) मिळवले जातात. आंबटशौकीन विनोद केला, म्हणजे प्रसिद्धी तर मिळतेच आणि पैसाही मिळतो, याखेरीज वेगवेगळ्या व्यासपिठांवर बोलावणे येते ते वेगळेच ! त्यामुळे नवीन विनोदी कलाकारांना अश्लील विनोद करणे, म्हणजे ‘चांगला विनोदी कलाकार’, असाच संदेश मिळतो. त्यामुळे कलाकार घडतो कि बिघडतो, असाच प्रश्न निर्माण होतो. मुख्य म्हणजे या विनोदांवर नियंत्रण ठेवणारी कुणी संस्था अथवा यंत्रणा आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो. यामध्ये मुनव्वर फारूखीसारखे ‘कॉमेडियन’ हिंदूंच्या परंपरा, देवता यांवरही विडंबनात्मक विनोद सादर करतात. याविषयी २-३ वेळा गदारोळ झाला आहे. याविषयीही काही कायदा अथवा मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या नाहीत. त्यामुळे विडंबन करणार्‍यांना मोकळीक मिळते. परिणामी अश्लील अथवा अवमानकारक असा एखादा मोठा प्रकार घडल्यासच या विनोदांकडे लक्ष जाते.

विनोदाला राजकीय पार्श्वभूमी !

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘स्टँडअप कॉमेडियन’ कुणाल कामरा यांनी केलेल्या अवमानकारक कवितेचा विषय गत १ आठवड्यापासून गाजत आहे. त्यांनी तर थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केले आहे आणि आता राजकीय भूमिका घेतल्याप्रमाणे कामरा यांचे वागणे चालू आहे. त्यांची क्षमा मागण्याचीही सिद्धता नाही. कुणाल कामरा यांच्यासारख्यांवर निर्बंध कधी घालणार ? त्यांच्यावर कठोर कारवाई केव्हा होणार ? कुणाल कामरा यांचा विनोद अथवा कलाकारितेला राजकीय वास येत आहे, तरी ‘त्यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे’, असे त्यांचे आणि विरोधक राजकीय पक्षांचे सूत्र आहे. याच वेळी मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांचा विषय स्मरतो की, तिने एका राजकीय नेत्यावर एका दुसर्‍या व्यक्तीने केलेली कविता स्वत:च्या सामाजिक माध्यमाच्या खात्यावर प्रसारित केली. त्यामुळे जणू तिनेच ती अवमानकारक कविता केली, या दृष्टीने तिच्यावर २० हून अधिक ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी प्रविष्ट झाल्या. आता जे राजकीय पक्ष अभिनेत्रीला तेव्हा विरोध करत होते, ते आता कामराला विरोध करत नाहीत, म्हणजे हास्यकलाकारांनी केलेले विनोद निवडक पद्धतीने किंवा स्वत:ला सोयीचे तेवढे घेतले जातात आणि इतरांकडे दुर्लक्ष केले जाते. अशाने या कलाकारांकडून होणारा थिल्लरपणा थांबणार का ?

काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या चारोळ्या, अथवा शाब्दिक फटकारे अनेकांनी वर्तमानपत्रांमध्ये वाचले असतील. त्यांनी एका वाहिनीवर सांगितले, ‘आमच्या काळी आम्ही जे काही विनोद करायचो, त्याने निखळ मनोरंजन व्हायचे, लोकांची करमणूक व्हायची. राजकीय व्यक्तींवरही विनोद केले जायचे; मात्र त्यामुळे कुणाचे मन दुखावले जायचे नाही, उलट राजकीय व्यक्तीही त्याचा आनंद घ्यायचे. विनोदही हलकेफुलके होते, कुणाच्या भावना दुखावल्या जायच्या नाहीत.’ विनोदाविषयी त्यांनी त्यांचा अनुभव सांगतांना म्हणाले, ‘स्वत: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना संपर्क करून त्यांचे अभिनंदन केले होते.’ याचा अर्थ तेव्हा राजकीय नेतेही विनोदांची चांगली नोंद घ्यायचे. जुन्या काळातील विनोदी लेखक पु.ल. देशपांडे, आचार्य प्र.के. अत्रे यांच्या लिखाणामुळे कुणी दुखावल्याचे स्मरत नाही, तेही हलकेफुलके विनोद करायचे. त्यातून लोक आनंद घ्यायचे. आता रणवीर अलाहबादिया यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या एका तरुणाने सांगितले, ‘लोकांना असे विनोद चालत नसतील, तर त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (‘एआय’चा) उपयोग करून विनोद करून ते ऐकावेत.’ येथे प्रश्न विनोदांचा नाही, तर विनोदासाठी निवडण्यात येणारे विषय आणि विनोदांचा दर्जा यांचा आहे. विनोदासाठी अनेक चांगले विषय आहेत, सध्याही अनेक विनोदी कलाकार विनोदाचे चांगले कार्यक्रम सादर करत आहेत. त्यांना प्रतिसादही चांगला आहे. त्यांचा एक वर्गही आहे. विनोदातूनही अनेक कलाकार समाजप्रबोधन, समाज जागृतीही करत आहेत, म्हणजे दोन्ही गोष्टी ते साध्य करत आहेत. त्यांच्याकडून आताच्या तरुण कलाकारांनी आदर्श घ्यावा. काही वर्षांपूर्वी विनोदाच्या नावाखाली चित्रपट अभिनेते-अभिनेत्रींचा सहभाग असलेला एक कार्यक्रम घेण्यात आला, त्यामध्ये तर सर्रास शिव्यांची लाखोली वहात ‘ब्लॅक कॉमेडी’च्या नावाखाली विनोद केले जात होते. सध्या लोकांचे जीवन आणि मन एवढे अस्थिर अन् अशांत झाले आहे की, त्यांना विरंगुळा वा पालट हवा असतो. यावर लोकांना धर्माचरण आणि धर्मशिक्षण यांचा पर्याय आहे, हे लक्षात आलेले नाही. तेही व्यवस्था उभारून देणे आवश्यक आहे. अन्यथा ‘टवाळा आवडे विनोद’ असेच चालू रहाण्याची भीती आहे.

अश्लीलता आणि विकृती यांचा भरणा असलेले विनोदी कार्यक्रम अन् कलाकार यांच्यावर लोकांनी बहिष्कारच घालणे आवश्यक !