संपादकीय : हिंदुद्वेषी पिलावळ ! 

काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई

‘औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीप्रमाणे मारले’, असे विधान काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केले होते; पण खरेतर याला कोणताही तार्किक किंवा समकालीन आधार नाही. कोणताही ऐतिहासिक आधार नाही. साकी मुस्तेद खान आणि भीमसेन सक्सेना हे औरंगजेबाच्या पदरी असलेले इतिहासकार सांगतात, ‘औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना अत्यंत निर्दयपणे आणि क्रूरपणे हाल हाल करून मारले.’ ‘याला कोणताही मनुस्मृतीचा किंवा ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नाही’, अशी सार्वजनिक स्वीकृती संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी नुकतीच एका चर्चासत्राच्या वेळी दिली आहे. यावर दलवाई महाशयांना काय म्हणायचे आहे ? एकच विचारसरणी असणार्‍यांनी त्यांचे बिंग फोडले, याविषयी दलवाई हे श्रीमंत कोकाटे यांना काही सुनावतील कि मूग गिळून मुकाट गप्प बसतील ? हे पहाणे हिंदूंसाठीही औत्सुक्याचे ठरणार आहे. यातून ‘खोट्या कथानका’चे आणखी एक षड्यंत्र उद्ध्वस्त झाले. हिंदूंच्या संदर्भात जरा कुठे काही घडले की, त्याचे खापर ‘मनुस्मृती’वर फोडून मोकळे व्हायचे, हे या हिंदुद्वेष्ट्यांना चांगले जमते. मनस्मृती कशी अपकीर्त करता येईल आणि स्वतःच्या अकलेचे तारे तोडून बौद्धिक दिवाळखोरी घोषित करता येईल, हा एकच विचार त्यांच्या डोक्यात असतो.

तोंडावर आपटले ! 

औरंगजेब हा कट्टर हिंदुविरोधक आणि हिंदुद्वेष्टाही ! हिंदुद्वेष त्याच्या नसानसांत भिनला होता. त्याच्या दृष्टीतूनही द्वेषाचा अंगार प्रगट होत असे. जो मनुष्य दिवसरात्र हिंदुद्वेष्ट्या विचारात गर्क असेल आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या शेवटच्या घटका मोजत असेल, तो मनस्मृतीवर कशाला अवलंबून राहील ? छळ कसा करावा ? याचे मनसुबे औरंग्याच्याच डोक्यात शिजलेले होते, हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाने पाहिले आणि अनुभवलेसुद्धा ! त्यामुळे असा हिंदुद्वेष्टा औरंगजेब छत्रपती शंभूराजांना मारण्यासाठी मनुस्मृतीसारख्या प्राचीन भारतीय हिंदु धर्मशास्त्रविषयक ग्रंथाचा का बरे आधार घेईल ? इतके साधे ज्ञानही दलवाईंना नसावे, याचे आश्चर्यच वाटते. त्यामुळे ‘दलवाई यांनी असे विधान करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे’, असे म्हणावे लागेल आणि आता श्रीमंत कोकाटे यांनी स्वीकृती देत दलवाई यांचे पितळच जणू उघडे पाडले आहे. ‘ना घरका ना घाट का’, अशी त्यांची स्थिती झाली !

‘मनुस्मृती’ हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे. हिंदु धर्म सहिष्णुता शिकवतो. त्यामुळे एखाद्याला मरणयातना कशा द्याव्यात ? याचा उल्लेखच मनुस्मृतीत नाही ! असे असतांना दलवाईंनी इतके धादांत खोटे विधान का केले ? स्वधर्माच्या धार्मिक ग्रंथांविषयी त्यांनी कधी असे उद्गार काढण्याचे धाडस तरी केले असते का ? हिंदूंचा, तसेच हिंदु धर्मग्रंथांचा उघडउघड अवमान केल्याप्रकरणी दलवाई यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी. शिवप्रेमींनी दलवाईंच्या विरोधात संघटित होऊन त्यांना ठोस प्रत्युत्तर द्यायला हवे. छत्रपती संभाजीराजेंनी असह्य मरणयातना सहन करूनही धर्मनिष्ठता जोपासली. आज आपल्याला धर्मनिष्ठ राहून त्यांचा सन्मान करण्याची आणि आदर्श जोपासण्याची संधी मिळत आहे. ती संधी घेऊन दलवाईंसारख्या हिंदुद्वेष्ट्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूसंघटनाचा आविष्कार दाखवायला हवा. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानानिमित्त बलीदान मास पाळणार्‍यांनी केवळ तेवढेच न करता अशा प्रकरणातही वैध मार्गाने कृतीशील होऊन सामर्थ्य दाखवून द्यावे. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात ‘ब्र’ काढण्याचेही कुणाचे धाडस होऊ नये, असा वचक आपण निर्माण करायला हवा. श्रीमंत कोकाटे महाशयांनी दलवाई यांना चपराक दिल्यावर पोलीस प्रशासन दलवाई यांच्या विरोधात कोणती कारवाई करणार आहे ? हे जनतेला समजायला हवे.

एकाच माळेचे मणी ! 

वर्ष २०२४ मध्ये ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’त प्रक्षोभक भाषण करत समाजात द्वेष निर्माण करणार्‍या हिंदूंवर राज्‍य सरकारने कारवाई करावी’, अशी मुक्ताफळे याच दलवाई महाशयांनी उधळली होती. प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नसतांना दलवाई यांनी केवळ हिंदुद्वेषापोटी ही मागणी केली. अशा प्रकारे ‘प्रत्येक वेळी हिंदू, हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांच्यावरच डाव उलटवू पहाणार्‍या दलवाईंवरच कठोर कारवाई व्हायला हवी’, असे हिंदूंना वाटते. तसे झाल्याविना हिंदुद्वेषाचा कडेलोट होणार नाही. गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘कर्करोग’ म्हटले. त्याचे समर्थन हुसेन दलवाई यांनी करत संघाला ‘आतंकवादी संघटना’ असल्याचे संबोधले. हिंदूबहुल राज्यात अशांवर वेळीच कारवाई होत नसल्याने ते अशी विधाने वारंवार करण्यास धजावतात. प्रत्येक वेळी हिंदूंना दुटप्पी वागणूक देत अन्य धर्मियांची तळी उचलण्याचे काम करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांनी हिंदूबहुल राज्यात राहूच नये. धर्मप्रेमींना ‘देशद्रोही’ संबोधणार्‍या अशांना कारागृहात का डांबले जात नाही ?

हिंदूंच्या मतावर निवडून आलेल्या शासनानेही यावर विचार करायला हवा.   

दलवाई यांचे पितळ उघडे पाडणारे श्रीमंत कोकाटे हेही दलवाई यांच्याप्रमाणे ब्राह्मणद्वेषाच्याच माळेचे मणी ! दलवाई यांनी संघाला ‘आतंकवादी संघटना’ संबोधले, तर कोकाटे यांनी काही वर्षांपूर्वी संघाला ‘दंगली घडवणारी संघटना’ म्हटले. अर्थात् संघ असो किंवा मनुस्मृती असो, त्यांच्यावर असे बेछूट आरोप करणार्‍यांकडे त्याविषयी ना पुरावे असतात, ना कोणताही आधार असतो. केवळ हिंदुद्वेषाची गरळ ओकत रहायची, इतकेच त्यांना ठाऊक असते. जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणे, समाजात फूट पाडणे हीच कामे त्यांच्याकडे असतात आणि मुख्य म्हणजे अशी कामे करणार्‍यांना अनेक देशी-विदेशी संघटना सर्रास निधी पुरवतात. त्यामुळे अशांचा गाडा चालू रहातो. कोकाटे यांचा पूर्वेतिहासही दलवाईंप्रमाणेच आहे. प्रत्येक कार्यक्रमातून त्यांनी हिंदु धर्म, देवता, राष्ट्रपुरुष, संत, ब्राह्मण यांच्या विरोधात विद्वेष पसरवण्याचेच काम केले. जरी आज त्यांनी दलवाई यांच्या विधानाविषयी स्वीकृती दिलेली असली, तरी कोकाटे यांच्याही आतापर्यंतच्या विधानांची पुष्टी करणे आवश्यक आहे. हिंदूंच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर रोख आणू पहाणारे स्वतः मात्र अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवतात. त्यामुळे हिंदूंनी आता संघटित होऊन प्रत्येक धर्मद्वेष्ट्याला त्याची जागा आणि हिंदूसंघटनाचा प्रभाव दाखवून देण्याची वेळ आली आहे. हिंदू जागृत होत आहेत. हिंदूंच्या धर्मभावनांवर मीठ चोळणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांनी वेळीच तोंडाला लगाम घालावा, अन्यथा धर्मप्रेमी हिंदू त्यांना सरळ केल्याविना रहाणार नाहीत, हेच खरे !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात हिंदु धर्मप्रेमींचे संघटनच हवे !