३१ डिसेंबर या दिवशी पुण्यात पुन्हा एल्गार परिषद घेण्याचा डाव

आयोजनासाठी पोलिसांकडे अनुमती मागितली

निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील

पुणे – कोरेगाव भीमा येथील लढाईला २०० वर्षे होत असल्याच्या निमित्ताने शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता येत्या ३१ डिसेंबर २०२० या दिवशी गणेश कला क्रीडा मंच येथे या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी स्वारगेट पोलिसांकडे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या वतीने अनुमतीसाठी अर्ज करण्यात आला आहे. गेल्या वेळेचा अनुभव पहाता पोलीस या परिषदेला अनुमती देणार का ?, याविषयी साशंकता आहेे; मात्र ‘अनुमती नाकारण्यात आल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल’, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या परिषदेच्या नियोजनाच्या संदर्भात नुकतीच साने गुरुजी स्मारकाच्या आवारात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

वर्ष २०१७ मधील एल्गार परिषदेनंतर दुसर्‍या दिवशी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचाराला एल्गार परिषदेचीच पार्श्‍वभूमी कारणीभूत असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेच यात माओवाद्यांचा सहभाग असल्याचेही आरोप करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण एन्आयएकडे वर्ग करण्यात आले आहे. यातून देशभरातील अनेक डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते, लेखक, कवी यांच्यावर गुन्हे नोंद होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा, एल्गार परिषद प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 (सौजन्य : ABP MAJHA)

स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांनी सांगितले की, लोकशासन आंदोलन या संस्थेकडून परिषदेला अनुमती मिळावी, असा अर्ज करण्यात आला आहे; मात्र अद्याप कोणतीही अनुमती देण्यात आलेली नाही.

एल्गार परिषदेला अनुमती देण्याविषयीचा निर्णय राज्य सरकार घेईल ! – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

सोलापूर – निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी पुणे येथे एल्गार परिषद भरवण्यासाठी अनुमती मागितली आहे. त्यासाठी स्वारगेट पोलीस ठाणे येथे एल्गार परिषदेने अनुमती अर्ज केला आहे. त्यावर भाष्य करतांना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले, की अनुमती द्यावी कि नाही, हे राज्य सरकार ठरवेल. शंभूराज देसाई सोलापूर दौर्‍यावर होते. त्या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत एल्गार परिषदेविषयी माहिती दिली.