नाथपंथी कीर्तनकार मिलिंद चवंडके यांच्या आवाहनास प्रतिसाद देत दुधोडी पंचक्रोशीतील महिलांनी हात उंचावून घेतली शाकाहाराची शपथ !

दुधोडी येथील धर्मनाथ बीजोत्सव सोहळा !

काल्याचे कीर्तन करतांना नाथ संप्रदायाचे संशोधक मिलिंद महाराज चवंडके. समोर पंचक्रोशीतील भाविक ग्रामस्थांची अलोट गर्दी

नगर – जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुधोडी येथे २९ व्या धर्मनाथ बीजोत्सव सोहळ्यात काल्याचे नाथपंथी कीर्तन करतांना ह.भ.प. मिलिंद चवंडके यांनी उपस्थित सर्वांना आपापले घर पवित्र रहाण्यासाठी शुद्ध शाकाहार करण्याचे आणि शरिराच्या पावित्र्यासाठी व्यसनमुक्त रहाण्याचे आवाहन केले. त्या आवाहनास प्रतिसाद देत दुधोडी पंचक्रोशीतील उपस्थित महिलांनी हात उंचावून ‘घरात शाकाहारा’च सिद्ध करू, अशी शपथ घेतली, तर ग्रामस्थांनी व्यसनमुक्त रहाण्याचा संकल्प केला. भाविकांनी ह.भ.प. चवंडके यांच्या हातून तुळशीमाळाही घालून घेतल्या. भाविकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने आयोजक भारावून गेले.

कीर्तनाच्या पूर्वरंगात नाथ संप्रदायातील धर्मनाथांचे चरित्र आणि उत्तररंगात भगवान श्रीकृष्णाचे चरित्र सांगतांना त्यांनी प्रतिदिनच्या जीवनातील दिलेली उदाहरणे उपस्थितांना चांगलीच भावली.

हरिनाम सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी उपसरपंच रवींद्र जांभळे, हनुमंत गोळे, गणेश जांभळे, झुंबर जांभळे, राजेंद्र भोसले यांच्यासह जांभळे, परकाळे, भोसले, गोळे, कोर्‍हाळे, घोलप, पोटे, शिंदे, खुडे, कांबळे रणधीर परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रकाश किसन परकाळे यांनी उत्सवातील काल्याचा महाप्रसादाची व्यवस्था केली होती. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दुधोडी येथे पुरातन धर्मनाथ मंदिर असल्याने धर्मनाथ बीजोत्सव सोहळा भाविक  ग्रामस्थ अत्यंत श्रद्धेने साजरे करतात. २९ व्या धर्मनाथ बीजोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यासाठी ह.भ.प. मिलिंद चवंडके यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा उपजोनिया पुढती येऊ । काला खाऊ दहिभात ।। वैकुंठी तो ऐसे नाही । कवळ काही काल्याची ।। एकमेका देऊ मुखी । सुखे घालू हुंबरी | तुका म्हणे वाळवंट । बरवे नीट आणि उत्तम ।। हा काल्याचे महत्त्व वर्णिणारा अभंग घेतला होता.

धर्मनाथांचा जन्म, त्यांची नाथपंथी दीक्षा, कठोर तपश्चर्या, विद्याभ्यास, देव-देवतांचा वरप्रसाद आणि धर्मनाथ बीज साजरी करण्याचे गोरक्षनाथांनी सांगितलेले महत्त्व आज २९ व्या वर्षातील काल्याच्या कीर्तनात प्रथमच तपशीलवार ऐकले, असे उपस्थितांनी मंडपातच सांगितले.

तेव्हा ह.भ.प. मिलिंद चवंडके यांनी धर्मनाथांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे. येथील पावित्र्य जपण्याचे प्रत्येक ग्रामस्थाचे आणि भगिनीचे प्रथम कर्तव्य आहे. भगिनींनी आज आपले घर जसे पवित्र आहे, तसे कायम ठेवण्यासाठी घरात शुद्ध शाकाहारीच स्वयंपाक करेल, अशी शपथ धर्मनाथांचे स्मरण करत घ्यावी, असे म्हणताच उपस्थित सर्व महिलांनी-युवतींनी हात उंचावून जाहिरपणे शपथ घेतली. ग्रामस्थांनी व्यसनमुक्त रहाण्याचा संकल्प करावा, असे आवाहन ह.भ.प. मिलिंद चवंडके यांनी केले. कीर्तन मंडपातील वातावरण धर्मनाथांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने भारावून गेले होते. आबुशेठ खुडे आणि शिवाजी जांभळे यांच्या हस्ते ह.भ.प. मिलिंद चवंडके यांना पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले.