
मुंबई – देशातील पहिली वॉटर टॅक्सी मुंबई येथे धावेल. स्वीडन येथील कॅन्डेला आस्थापन पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रकल्प राबवणार असून ही सेवा त्वरित चालू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्यदूत यांना बैठकी दरम्यान दिल्या. मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रकल्पाने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास साहाय्य होईल. नागरिकांची सुरक्षितता, वातावरण, पर्यावरण याचा स्वीडन आस्थापनाने त्यांच्याशी झालेल्या करारानुसार विचार करावा, तसेच वॉटर टॅक्सीचे दर माफक ठेवावेत. स्वीडनचे महावाणिज्य दूत यांनी बंदरांच्या विकासात स्वीडन आस्थापन योगदान देऊ इच्छित असल्याचे सांगितल्याने नितेश राणे यांनी ससून डॉकची पहाणी करण्याची सूचना केली.