Bangladeshi Military Coup : बांगलादेशी सैन्याने सत्तापालटाचे वृत्त फेटाळले !

डिसेंबरमध्ये होणार निवडणुका


ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात सैन्य अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांना हटवून सत्ता हातात घेणार असल्याचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर सैन्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे. सैन्याने हे वृत्त फेटाळून लावत म्हटले की, सैन्याने ढाक्यामध्ये एक नियमित बैठक घेतली होती. काही माध्यमांनी त्याविषयीचे वृत्त अशा प्रकारे सादर केले की, जणू काही सैन्य उठाव करणार आहे.

बांगलादेशाचे प्रसारमाध्यम सचिव शफीकुल आलम यांनी सांगितले की, हे वृत्त निराधार आहे आणि असे काहीही होणार नाही. आम्ही डिसेंबरमध्ये बांगलादेशात निवडणुका घेण्याची सिद्धता करत आहोत. बांगलादेशाचे अंतरिम सरकार सर्व राजकीय पक्षांशी बोलत आहे आणि त्यांच्या सूचनांनुसार मुक्त अन् निष्पक्ष निवडणुका घेण्यास वचनबद्ध आहे.