Pakistan Temple Vandalised : पाकिस्तानात श्रीराममंदिराची तोडफोड !

मंदिरातील मूर्तीही पळवली !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशाच्या विविध भागांत हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता सिंध प्रांतात घडली आहे. येथील श्रीराममंदिरातील मूर्ती हटवण्यात आल्या आहेत.

From <https://www.instagram.com/p/C8EMtPNtHVp/?hl=en>

सिंध प्रांतातील तांडो आदम शहरातील कच्छी कॉलनी परिसरात हे श्रीराममंदिर आहे. ७ जूनच्या रात्री काही अज्ञात या मंदिराला लावण्यात आलेले कुलुप तोडून आत घुसले आणि आतमध्ये ठेवलेल्या मूर्ती अन् श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली. येथे लुटालूट करण्यासोबतच मंदिराचीही तोडफोड करण्यात आली.

मंदिराचा जीर्णोद्धार होऊ दिला जात नाही !

पाकिस्तानमधील ‘व्हॉईस ऑफ मायनॉरिटी’ नावाच्या ‘एक्स’ खात्यावरून या  मंदिरातील मूर्ती हटवण्याच्या आणि तोडफोडीच्या घटनेची माहिती दिली आहे. यासोबतच एक व्हिडिओही प्रसारित करण्यात आला आहे, ज्यामध्ये मंदिराची अत्यंत दयनीय अवस्था दाखवण्यात आली आहे. स्थानिक हिंदूंनी अनेकवेळा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला; पण वारंवार अडथळे आणले गेले.

पाकिस्तानात हिंदूंची मंदिरे पाडण्याच्या बर्‍याच घटना घडल्या आहेत. यावर्षी मार्चमध्ये खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ असलेले एक ऐतिहासिक मंदिर पाडण्यात आले होते. मंदिर पाडल्यानंतर त्याच ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यात आले. या भागातील मूळ रहिवासी वर्ष १९४७ मध्ये भारतात स्थलांतरित झाल्यानंतर हे मंदिर बंद करण्यात आले. वर्ष १९९२ मध्ये अयोध्येत बाबरी ढाचा पाडल्यानंतर या मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण करून त्याची हानी केली होती.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. –  संपादक)

इस्लामाबादच्या श्रीराममंदिरात पूजा करण्यासाठी अनुमती नाही

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एक ऐतिहासिक श्रीराममंदिर आहे. हे मंदिर १६ व्या शतकात बांधले गेले आहे. भगवान श्रीराम त्याच्या १४ वर्षांच्या वनवासात त्याची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत काही काळ येथे वास्तव्यास होते, अशी येथील हिंदूंची श्रद्धा आहे. मंदिराला लागूनच एक तलाव आहे. त्याला ‘राम कुंड’ म्हणतात. भगवान श्रीरामाने येथे पाणी प्यायल्याची मान्यता आहे. या तलावामुळे याला ‘राम कुंड मंदिर’ म्हणतात; मात्र या मंदिरात हिंदूंनाच पूजा करण्याची अनुमती नाही. येथील मूर्तीही हटवण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

भारत असो कि पाकिस्तान हिंदूंना कुणीच वाली नाही, अशीच स्थिती आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी भारतातील हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे !