British MP Bob Blackman Demand : जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटीश सरकारने १३ एप्रिलपूर्वी भारताची क्षमा मागावी !

ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन यांची संसदेत मागणी

ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन

लंडन (ब्रिटन) – वर्ष १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटीश सरकारने भारतीय जनतेची औपचारिक क्षमा मागावी, अशी मागणी ब्रिटनमधील विरोधी कंझर्व्हेटिव्ह (हुजूर) पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी केली. त्यांनी २७ मार्च या दिवशी संसदेत बोलतांना ही मागणी केली. त्यांनी ब्रिटीश सरकारला १३ एप्रिलपूर्वी क्षमा मागण्यास सांगितले आहे. या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडाचा १०६ वा स्मृतीदिन आहे. आजपर्यंत कोणत्याही ब्रिटीश पंतप्रधानांनी जालियनवाला बाग हत्याकांडासाठी क्षमा मागितलेली नाही. तथापि अनेक ब्रिटीश नेत्यांनी वेळोवेळी याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे; परंतु अधिकृतपणे कुणीही क्षमा मागितलेली नाही.

ब्लॅकमन पुढे म्हणाले की, बैसाखीच्या (पंजाबमधील सण) दिवशी अनेक लोक त्यांच्या कुटुंबासह शांततेत जालियनवाला बागेत आले होते. जनरल डायर याने तेथे ब्रियीश सैन्याच्या वतीने सैनिक पाठवले आणि गोळ्या संपेपर्यंत निष्पाप लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. जालियनवाला हत्याकांड हा ब्रिटीश साम्राज्यावरील कलंक आहे. यामध्ये १ सहस्र ५०० लोक मृत्यूमुखी पडले आणि १ सहस्र २०० जण घायाळ झाले. ब्रिटीश साम्राज्यावरील या डागासाठी जनरल डायरची अपकीर्ती झाली. मग आपण सरकारकडून काय चूक झाली ?, हे स्वीकारून भारतियांची औपचारिक क्षमा मागितली का ?

का झाले जालियनवाला बाग हत्याकांड 

भारतातील क्रांतीकारी कारवायांना आळा घालण्यासाठी ब्रिटीश सरकारने रौलेट कायदा लागू केला. त्यात खटल्याविनाच कह्यात ठेवण्याची आणि गुप्तपणे खटले चालवण्याची तरतूद होती. याविषयी भारतीय जनतेमध्ये संताप होता. याचा निषेध करण्यासाठी लोक जालियनवाला बागेत जमले होते. यात महिला, मुले आणि वृद्ध लोकही उपस्थित होते. ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने त्याच्या सैन्याला लोकांवर थेट गोळीबार करण्याचा आदेश दिला. या सैन्यात गोरखा आणि बलुच रेजिमेंटचे सैनिक होते, जे ब्रिटीश भारतीय सैन्याचा भाग होते. जालियनवाला बागेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. रस्ता अरुंद असल्याने लोक पळून जाऊ शकत नव्हते. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या मारल्या. त्यांचे मृतदेह नंतर सापडले.

संपादकीय भूमिका

भारताने कधी अधिकृतपणे ब्रिटीश सरकारकडे क्षमा मागण्याची मागणी केली आहे का ? ब्रिटनच्याच एका खासदाराला सरकारने क्षमा मागावी, असे वाटते, तसे भारतातील किती खासदारांना वाटते आणि त्यातील किती जणांनी आतापर्यंत मागणी केली होती ?