म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवून तेथील शेतकर्‍यांचा पाण्याचा तुटवडा दूर केला ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बेळगाव येथील जाहीर सभेत विधान

  • केंद्राने म्हादई जलवाटप तंटा सोडवल्याचा केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दावा

पणजी, २८ जानेवारी (वार्ता.) – केंद्रशासनाने कर्नाटक आणि गोवा राज्यांमधील म्हादई जलवाटप तंटा सोडवून म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवून तेथील शेतकर्‍यांचा पाण्याचा तुटवडा दूर केला, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव, कर्नाटक येथे एका सार्वजनिक सभेत जनतेला संबोधित करतांना केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रसंगी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि गोव्यातील भाजपचे शासन यांचे म्हादई पाणीवाटप तंटा सोडवल्याबद्दल अभिनंदन केले. कर्नाटकमध्ये चालू वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याचे भाजपच्या प्रचाराच्या अनुषंगाने या सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे भाषणात वर्ष २००७ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी ‘म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू देणार नाही’, असे विधान केल्याचे उपस्थितांना स्मरण करून दिले. ते पुढे म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजपने दोन्ही राज्यांमधील तंटा सोडवून कर्नाटकमधील अनेक जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.’’

वास्तविक गोवा विधानसभेने यापूर्वी म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्यास विरोध दर्शवणारा ठराव घेतला आहे, तसेच १२ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा शासनाच्या शिष्टमंडळाने म्हादईप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देहली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या वेळी गोवा शासनाच्या शिष्टमंडळाने म्हादईप्रश्नी तातडीने ‘म्हादई जलव्यवस्थापन प्राधिकरण’ स्थापन करण्याची आणि कर्नाटकच्या म्हादईचे पाणी वळवण्याच्या प्रस्तावित कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला केंद्रीय जल आयोगाने दिलेली मान्यता रहित करण्याची मागणी केली होती.

म्हादईवरील प्रकल्पाचे काम लवकरच चालू होणार ! – बी.एस्. येडीयुरप्पा, माजी मुख्यमंत्री, कर्नाटक

पणजी – म्हादईवरील कळसा-भंडुरा प्रकल्प केंद्रशासनाच्या साहाय्याने पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे, अशी घोषणा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यानी बेळगाव येथे आयोजित भाजपच्या सभेत बोलतांना केली.

विरोधकांचे सरकारवर शरसंधान !

पणजी – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेळगाव येथील भाजपच्या सभेतील म्हादईसंबंधीच्या विधानानंतर विरोधी पक्षांनी गोवा शासनाला धारेवर धरले आहे. ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘गोव्यातील भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाशी फारकत घ्यावी किंवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे.’’

काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘म्हादई तुमची माता असेल, तर याप्रश्नी अमित शहा यांच्या विधानावर तुमचे उत्तर काय ? तुम्ही मुख्यमंत्री पदाचे त्यागपत्र देऊन निषेध नोंदवणार का ?’’

♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦