काही दिवसांपूर्वीच ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा चालू झाल्याने जगभरातील फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक ४ वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचे यजमानपद कतार या देशाकडे आहे. आतापर्यंत अनेक मुसलमानेतर देशांनी या स्पर्धेचे यजमानपद भूषवले आहे; पण कुणी या खेळात धर्म आणल्याचे ऐकिवात नाही. यास कतार हा इस्लामी देश मात्र अपवाद ठरला आहे. कतारने फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारतातून पसार झालेला आणि जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असलेला झाकीर नाईक याला ‘इस्लाम’ या विषयावर भाषण देण्यासाठी आमंत्रित केले. कतारच्या या निर्णयाचा जगभरातील एकाही देशाने निषेध नोंदवलेला नाही, हे विशेष ! स्वतःला पुरोगामी म्हणून घेणार्या आणि ‘खेळात धर्म नको’, असे म्हणणे सतत मांडणार्या युरोपीयन देशांनीही आता निमूटपणे ‘झाकीरी’ विष पिण्याची सिद्धता दर्शवली आहे. मुळात झाकीर नाईक हा भारतातील रहिवासी आहे. भारतात त्याने कसे, कुठे आणि किती विष ओकले आहे, हे जगजाहीर आहे. ‘पीस टीव्ही’च्या माध्यमातून त्याने भारतातच नव्हे, तर जगभर अशांतता निर्माण केली. त्याने हिंदु धर्मातील श्री गणेशासह अनेक देवतांचा उघडपणे घोर अपमान केला आहे. हिंदु धर्माविषयीसुद्धा त्याने वारंवर अपमानकारक विधाने केली आहेत. त्याच्यावर मुसलमान युवकांना भडकावण्याचा आणि चिथावणी देण्याचा आरोप आहे. ‘मुसलमानांनी आतंकवादी बनावे’, असे त्याने उघड आव्हान केले आहे. ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संघटनेच्या नावाखाली त्याने अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हिंदु धर्मातील तत्त्वज्ञानाचा सोयीस्कर अर्थ काढून त्याद्वारे त्याने अनेक हिंदूंचा बुद्धीभेद केला. त्याने त्याचे विष केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांत ओकले आहे. एवढ्यावरच झाकीर नाईकची कुकृत्ये संपत नाहीत, तर अनेक आतंकवाद्यांचा तो ‘नायक’सुद्धा आहे. बांगलादेशातील एका आतंकवादी आक्रमणातील आरोपीने त्याला हे कृत्य करण्यासाठी झाकीर नाईकच्या व्याख्यानातून ‘प्रेरणा’ मिळाल्याचे सांगितले. त्यापाठोपाठ अनेक आतंकवाद्यांनीही असेच सांगितले. आर्थिक क्षेत्रातही झाकीर नाईकने बरेच उपदव्याप केले आहेत. काळा पैसा पांढरा करण्याचा ठपका त्याच्यावर अन्वेषण यंत्रणांनी ठेवला आहे. या सर्वांमुळेच भारताने वर्ष २०१६ मध्ये त्याच्यावर बंदी घातली. भारताने बंदी घालण्यापूर्वी अनेक देशांनीही यापूर्वीच नाईकसाठी त्यांच्या देशाची दारे बंद केली आहेत. सध्या त्याला मलेशिया या इस्लामी देशाने आश्रय दिला आहे. हे सर्व सांगायचे तात्पर्य इतकेच की, आपण कुठल्या व्यक्तीला निमंत्रण देत आहोत, हे कतार सरकारला ठाऊक नाही, असे नाही. तरीही जाणूनबुजून त्याने नाईक याला पाचारण केले, तेही ‘इस्लाम’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी, यातूनच कतारला ‘फुटबॉलचे धर्मकारण’ करायचे असल्याचे स्पष्ट होते. वर म्हटल्याप्रमाणे जगभरातील एकाही देशाने, अगदी भारतानेसुद्धा याचा साधा निषेध केलेला नाही. भारताने केवळ अप्रसन्नता (नाराजी) व्यक्त केली आहे, जिला इस्लामी देश काडीचेही महत्त्व देत नाही. ‘झाकीर नाईक हा आतंकवादी कारवायांसाठी ओळखला जातो. बलपूर्वक धर्मांतर करणे, आत्मघातकी आक्रमणांचे समर्थन करणे, हिंदू, हिंदु देवता यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये तो दोषी आहे’, असे परराष्ट्र मंत्रालयाने नाराजीपत्रात म्हटले आहे. यासह भारताने कतारला ‘जर त्याने झाकीर नाईकला कुठल्याही कारणाने आमंत्रित केले, तर आम्ही आमचे प्रतिनिधी जगदीप धनखड यांचा कतारचा नियोजित दौरा रहित करू’, अशी चेतावणी दिली. याला कतारने अत्यंत साळसूद उत्तर दिले आहे. ‘आम्ही झाकीर नाईक याला कुठलेही अधिकृत निमंत्रण दिलेले नाही. भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय संबंध बिघडवण्यासाठी तिसराच देश अशी खोटी माहिती पसरवत आहे’, असे त्याने भारताला कळवले. कतारला भारत-कतार द्विपक्षीय संबंध सुदृढ ठेवण्याची इतकीच इच्छा असेल, तर त्याने वरीलप्रमाणे कागदी घोडे नाचवण्यापेक्षा झाकीर नाईकला त्यांच्या देशात येऊच का दिले ? ज्या झाकीर नाईक याने यापूर्वीच्या त्याच्या एका व्याख्यानात ‘इस्लाममध्ये फुटबॉल खेळणे हराम आहे’, असे वक्तव्य केले होते, ज्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे, आता त्याच झाकीर नाईकला जगातील सर्वांत मोठ्या फुटबॉल स्पर्धेच्या समारंभात बोलावणे, हा कतारचा आणि पर्यायाने ‘फिफा’चा दुटप्पीपणा नाही का ? कतार असो कि कुवैत सारेच इस्लामी देश भारताच्या डोळ्यांत कशा पद्धतीने धूळफेक करतात, हेच यावरून दिसून येते.
कतारच्या या भारतद्वेषी कृतीमुळे गोव्यातील भाजपचे प्रवक्ते साव्हिओ रॉड्रीग्स यांनी ‘भारताने कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेवर बहिष्कार घालावा’, अशी मागणी केली. ‘एकीकडे संपूर्ण जग आतंकवादाला तोंड देत असतांनाच दुसरीकडे झाकीर नाईकला आमंत्रित करून आतंकवादाला सहानुभूती दाखवून द्वेष पसरवण्याचा हा प्रकार आहे’, अशी टीका त्यांनी केली. रॉड्रीग्स यांची ही भूमिका राष्ट्रहितैषी आणि म्हणूनच स्वागतार्ह आहे. त्यामुळे आता तरी केंद्रातील भाजप सरकारने या स्पर्धेवर बहिष्कार घालून ‘राष्ट्र प्रथम’ असल्याचे कृतीतून दाखवून द्यावे.
खेळाडूंनीच बाणेदारपणा दाखवावा !
भारत-पाक क्रिकेट सामन्यांच्या वेळीही राष्ट्रप्रेमी नागरिक पाकवर बहिष्कार घालण्याची मागणी करतात. यंदा प्रथमच फुटबॉलच्या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. या सर्वांमध्ये एक खटकणारी गोष्ट म्हणजे, अशी भूमिका कधी आपले खेळाडू का घेत नाहीत ? त्यांना देशाचा अभिमान नाही का ? कि ते केवळ पैशांच्या मागे लागले आहेत ? ‘भारताचे शत्रू असलेल्या, तसेच भारताची वारंवार कुरापत काढणार्या देशाविरुद्ध आम्ही खेळणार नाही’, अशी बाणेदार भूमिका भारतीय खेळाडूंनी घेतल्यास जनतेच्या दृष्टीने ते खर्या अर्थाने विजेते ठरतील आणि मग त्यांना वेगळा चषक मिळवण्याची आवश्यकताच उरणार नाही !
भारताविरुद्ध बोलणार्या आणि वागणार्या देशांवर बहिष्कार घालण्याची भूमिका भारतीय खेळाडू कधी का घेत नाही ? |