गुरुतत्त्व आणि राष्ट्रहित !

भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।

अर्थ : सर्व भावांपासून मुक्त आणि त्रिगुणरहित अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो.

आज सनातन भारतीय संस्कृतीचा आत्मा असलेला सर्वांत महत्त्वाचा आणि महन् मंगल गुरुपौर्णिमेचा दिवस भारतात अन् विश्वभर साजरा होईल. भारतासह संपूर्ण विश्वच एका पुष्कळ मोठ्या परिवर्तनाच्या चक्रातून जात आहे आणि एक नवा आरंभ होण्यापूर्वीचा, प्रचंड घडामोडींनी गजबजलेला संधीकाळ सर्वजण सध्या अनुभवत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे महत्त्व वैयक्तिक उपासना आणि राष्ट्रकार्य या दोन्ही दृष्टीने अत्यंत अनन्यसाधारण असे आहे. भारतीय संस्कृतीत आयुष्याचे इतिकर्तव्य ‘मोक्षप्राप्ती’ सांगितले आहे आणि ते गुरुकृपेविना अशक्य आहे. शांतीपाठात गुरूंना ‘पूर्णस्वरूप’ म्हटले आहे. ईश्वराचेच रूप असणारे; परंतु सर्व कृत्यांपासून नामानिराळे रहाणारे गुरुतत्त्व हेच मानवाला मनःशांती आणि अंतिमतः आनंद देणारे आहे. भारतीय संस्कृतीत ‘राजसत्ता ही धर्मसत्तेच्या अधीन राहिली, तर ती यशस्वी आणि प्रजाहितकारक होते’, हे प्राचीनतम सिद्ध तत्त्व आहे. गुरुकृपेने आत्मबल प्राप्त झालेला राजा आणि ईश्वरभक्त प्रजा हेच आदर्श अन् समृद्ध राष्ट्राचे अधिकारी आहेत. ‘राष्ट्राचे मूळ इंद्रियनिग्रह आहे’, असे आर्य चाणक्य यांनी लिहून ठेवले आहे. आदर्श राष्ट्राचे मूळ अंतिमतः धर्म आणि साधना यांकडे येते अन् त्यासाठी गुरूंचे महत्त्व हे शब्दातीत आहे. अशा या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. अगदी कुणी कितीही नास्तिक, निधर्मी, पुरो(अधो)गामी किंवा साम्यवादी असला, तरी तो समाजात आणि राष्ट्रात रहातो. त्यामुळेच त्याचे अस्तित्व अबाधित असते. ‘समाज आणि राष्ट्र यांचा गाडा ईश्वरस्वरूप गुरुतत्त्वाविना चांगल्या प्रकारे चालू शकत नाही’, हे भारतीय संस्कृतीने सहस्रो वर्षे आधीच सिद्ध केलेले त्रिकालबाधित सत्य आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. हे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व आहे. ‘आज भारत पुन्हा एकदा विश्वगुरु होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे’, असे केवळ द्रष्टे संतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरांवरील विचारवंत आणि अभ्यासक सांगत आहेत. या दिशेने जाणार्‍या जगातील आणि भारतातील घडामोडींचा आढावा घेतला, तर त्याची सत्यता लक्षात येते. हिंदु संस्कृतीचा प्रभाव अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांमध्ये इतका मोठ्या प्रमाणात वाढलेला पहायला मिळत आहे की, हिंदूंची मते मिळवून तेथील निवडणुका जिंकण्यासाठी तेथील नेते त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील हिंदूंवरील आघातांची वृत्ते कधीही न देणारी प्रसारमाध्यमे आता हिंदूंवरील अन्यायाच्या संदर्भातील वृत्ते देऊ लागली आहेत. हा काळाचा महिमा आहे. ‘हिंदु’ या शब्दातील चैतन्यशक्ती कार्यरत झाली आहे आणि त्यामागील कारण सूक्ष्मातून कार्य करणारे ‘गुरुतत्त्व’ हे आहे. त्याचे स्थुलातून लक्षात येणारे भारतातील सकारात्मक परिणाम आणि त्यामुळे त्याला होणारा विरोध सर्व भारतीय अनुभवत आहेत. असे असले, तरी भारत ‘विश्वगुरु’ होण्याचा मार्ग हा सरळ आणि सोपा नाही. यासाठी भारतियांना म्हणजेच हिंदूंना अहोरात्र परिश्रम आणि कष्ट घ्यावे लागणार आहेत. आध्यात्मिक बलसंपन्न समाजच भारताला विश्वगुरुपदी आरूढ करू शकतो, हे येथे लक्षात घ्यायला हवे. भारतातील हिंदु समाज हा मूलतः धार्मिक आहेच; मात्र सध्याच्या घडीला त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी गुरुतत्त्व कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कार्यरत आहेच. ते ग्रहण करून समाजाने कृती करणे आवश्यक आहे.

आपत्काळाची सिद्धता हीच साधना !

भगवान विष्णु हा बालमुकुंद स्वरूपात प्रयागराज येथील अक्षयवटावर विराजित होऊन संपूर्ण सृष्टीचे बीज स्वतःच्या हातात सुरक्षित ठेवतो आणि त्यानंतर पुन्हा सृष्टीचे सृजन करतो. अगदी तसेच समाज आणि राष्ट्र रसातळाला जात असतांना, धर्माला ग्लानी आलेली असतांना सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांसह अनेक ऋषितुल्य संतमहात्मे यांनी ‘भारतात पुन्हा रामराज्य यावे’, असा संकल्प सोडला आहे; परंतु हे रामराज्य येण्यापूर्वी अर्थातच घनघोर धर्म-अधर्म युद्ध स्थुलातून आणि सूक्ष्मातून होणार आहे.

या आपत्काळाविषयी सर्व द्रष्ट्या संतांनी सूतोवाच केले असतांना आपण त्याची पूर्वसिद्धता करून आपली भक्ती वाढवणे, हीच प्रत्येकाची सद्य:स्थितीतील साधना आहे; नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. श्रीलंकेत चालू असलेल्या अराजकासारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडी, भारतात होत असलेले हिंदूंचे शिरच्छेद आणि त्या प्रकरणी ढवळून निघालेले वातावरण, अमरनाथ गुहेजवळ आलेली नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घडामोडी या सर्व आपत्काळाच्याच दर्शक आहेत. अशा घटनांचा परमोच्च बिंदू हळूहळू गाठला जाणार आहे आणि कोरोना महामारीपेक्षाही अधिक भयानक काळ येणार आहे. अन्न-पाण्यावाचून जनता एकमेकांच्या जिवावर उठणार आहे. या सर्व परिस्थितीतून तिसरे महायुद्ध प्रत्यक्ष चालू होणार आहे. ‘पहिली २ महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील इतके ते मोठे असेल’, असे द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. या सर्वांतून तरून जाऊन आदर्श राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपत्काळाच्या दृष्टीने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम होणे, हे या घडीला प्रत्येकाचे कर्तव्य ठरते अन् त्यासाठी गुरुतत्त्वाची कृपा आवश्यक आहे. गुरूंच्या कृपेस पात्र होणे, ही सोपी गोष्ट नाही; मात्र ती म्हणावी तितकी कठीणही नाही. अहंकार त्यागून संपूर्ण शरणागतीने शिष्य गुरूंना शरण गेल्यावर ते शिष्यावर कृपेचा वर्षाव करतात. सतत आपल्यावर गुरुकृपा रहावी, यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतात. अशा प्रकारे कठोर प्रयत्न करून गुरुकृपा संपादन केलेल्यांविषयीची शेकडो उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. हे लक्षात घेऊन शिष्योत्तम म्हणजेच स्वतः सक्षम भक्त बनून राष्ट्रासाठी समर्पित होता यावे, यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी गुरुचरणी प्रार्थना करून त्यांच्या कृपेस पात्र होऊया !