अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार (बच्चाबाझी) : एक विकृती !

जानेवारी २०१९ मध्ये एका फेसबूक पेजवर १०० हून अधिक मुलांच्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. या व्हिडिओचा शोध घेतल्यावर अफगाणिस्तानमधील अनुमाने ५०० तरुण मुलांच्या लैंगिक अत्याचाराचे जाळे समोर आले ! हे व्हिडिओ प्रसारित करणार्‍या व्यक्तींना अफगाणिस्तानमध्ये धमकावण्यासह देशातून हुसकावून लावण्यात आले. या व्यक्तींनी पोस्ट केलेले व्हिडिओ अफगाणिस्तानमध्ये अतिशय सामान्य असून त्याला ‘बच्चाबाझी’ असे म्हटले जाते. कोवळ्या वयातील विशेषतः पुरुष मुलांचा ‘संभोगाचे साधन’ म्हणून केला जाणारा वापर हा अफगाणिस्तान, तसेच पाकिस्तानमधील कित्येक प्रांतात दैनंदिन जीवनातील सहज भाग आहे. पेशावर आणि अन्य सरहद्द प्रांतातील बहुतेक ढाबे हे पाकिस्तान-अफगाणिस्तान मालवाहतूक करणार्‍या ट्रकचालकांची केवळ खाण्याची ठिकाणे नसून तेथेच जेमतेम ५० ते १०० रुपयांमध्ये खाट आणि ८ ते १० वर्षांची कोवळ्या वयातील मुले लैंगिक सुखासाठी उपलब्ध करून दिली जातात. या कोवळ्या मुलांना या बदल्यात मिळते एक शीतपेयाची बाटली !

बच्चाबाझीविषयी विदेशी वृत्तवाहिनी आणि संस्था यांनी केलेले सर्वेक्षण

अ. एका विदेशी वाहिनीने याविषयी पाकिस्तानमधील ट्रकचालकांचे सर्वेक्षण केल्यावर त्यातून समोर आलेली माहिती धक्कादायक होती. या चालकांपैकी अनुमाने ९५ टक्के व्यक्तींनी नियमितपणे बच्चाबाझी करत असल्याचे मान्य केले. इतकेच नव्हे, तर ‘लांब पल्ल्याचा प्रवासात बायको अथवा अन्य कोणत्याही महिलेला बरोबर घेऊन जाणे सुरक्षित नाही’, असे सांगत त्याऐवजी ‘क्लिनर म्हणून काम करणार्‍या मुलाला दिवसाचा प्रवाससोबती आणि रात्रीला शय्यासोबती यांकरता वापरणे’, हे अधिक योग्य असल्याचे बेधडकपणे सांगितले.

वैद्य परीक्षित शेवडे

आ. ‘साहिल ऑर्गनायझेशन’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ‘६ ते १५ वर्षे या वयोगटातील मुलांचा बच्चाबाझीकरता सर्वाधिक उपयोग केल्याचे आणि त्यातही मुलींपेक्षा मुलांवर तसे अधिक अत्याचार होत आहेत’, असे नमूद करण्यात आले.

इ. ‘सेव्ह द चिल्ड्रन अफगाणिस्तान’ यांच्याद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ‘अनुमाने ९१ टक्के अपंग मुलांना या अत्याचाराला सामोरे जावे लागते’, असे धक्कादायक वृत्तही समोर आले आहे.

ई. ‘डेली मेल’मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बच्चाबाझीमध्ये लहान मुलांचे शोषण करणारी व्यक्ती या अत्यंत शक्तीशाली समजल्या जातात. शोषित मुले मोठी झाल्यावरही त्यांच्याकडे अत्यंत विचित्र नजरेने पाहिले जाते. याखेरीज लहानपणीच्या अत्याचारामुळे त्यांच्या मानसिकतेवर सखोल परिणाम होत असल्याचेही म्हटले आहे.

विकृतीचे किळसवाणे समर्थन आणि दूरगामी परिणाम

या सार्‍या विकृतीचा एक दूरगामी परिणाम म्हणजे यातील कित्येक लहान मुले मोठी झाल्यावर ‘आपणही स्वतःकडे अशाच प्रकारे बच्चाबाझीकरता अन्य मुलांना ठेवून घेऊ’, अशा विचित्र मानसिकतेत सापडलेली आढळतात. एखाद्या विकृतीसमोर शरणागती पत्करण्याचे यापेक्षा घृणास्पद उदाहरण आणखीन काय असेल ? इस्लाममध्ये समलैंगिकता वर्ज्य मानलेली असूनही ‘प्रबळ कामेच्छा शमवण्याचा मार्ग’ असे किळसवाणे समर्थन या प्रकारचे हिणकस कृत्ये करणारे लोक करतात. विशेष म्हणजे धर्मांध तालिबानी राजवटीमध्ये मात्र बच्चाबाझी निषिद्ध होती. इतकेच नव्हे, तर तसे करणार्‍या व्यक्तीला मृत्यूदंड दिला जात असे.

अमेरिकन सैन्याची मूकसंमती आणि तेथील विद्वानांचे सोयीस्कर मौन

अफगाणिस्तानमध्ये ठेवण्यात आलेल्या अमेरिकन सैन्यानेही या दुष्कृत्याला अनेकदा मूकसंमती दिल्याचे यापूर्वी जगासमोर आले आहे. लान्स कॉर्पोरल ग्रेगरी बकली नामक अमेरिकन सैनिकाला लष्करी छावणीत ठार करण्यात आले होते. यामागचे कारण म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या मित्रराष्ट्रातील बच्चाबाझी करणार्‍या एका अधिकार्‍याविरुद्ध त्याने सातत्याने तक्रारी केल्या होत्या. वर्ष २०१५ मध्ये न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत डॅन बॅनर नामक अमेरिकन लष्करी अधिकार्‍याने बच्चाबाझीविषयी स्वतःचा अनुभवकथन केला होता. यानंतर डॅन यांची संपूर्ण कारकीर्द समाप्त करण्यात आली.

जानेवारी २०१८ च्या अहवालानुसार वर्ष २०१० ते २०१६ या कालावधीत अमेरिकन सैन्याने अफगाण सैन्याला ५ सहस्र ७५३ वेळा मानवतेविरुद्ध गैरकृत्य होत आहे वा नाही, याची पडताळणी करण्यास सांगितले होते. प्रत्यक्षात अशी पडताळणी एकदाही करण्यात आली नाही. थोडक्यात अफगाण सैन्याने अमेरिकन सैन्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. तसे असूनही अमेरिकेने याविरुद्ध चकार शब्द काढला नाही. सत्तालोलुपता ही किती अधःपतन करण्यास कारणीभूत ठरू शकते, याचे हे उदाहरण असावे. भारतात जम्मू-काश्मीरमध्ये चालू असलेल्या तथाकथित अन्यायाविरुद्ध सातत्याने बोलणारे अमेरिकेतील विद्वान स्वतःच्या सैन्याच्या सहकार्‍यांविषयी मात्र सतत मौन बाळगतांना आढळतात. इथेच त्यांचा हेतूही स्पष्ट होतो.

भारतातील ‘जमात ए पुरोगामी’ गप्प का ?

भारतातील मंदिरात जाऊन पाणी पिण्याच्या घटनेवरून एखाद्या व्यक्तीला चोप देण्यात आल्याचे असत्य कथन करत असतांना देशातील ‘जमात ए पुरोगामी’ची प्रसारमाध्यमे थकत नाहीत; मात्र हीच प्रसारमाध्यमे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील बच्चाबाझीसारख्या गंभीर अत्याचाराविषयी चकार शब्द काढत नाहीत. आपले विवक्षित अजेंडे पुढे ढकलण्यात मग्न असलेल्या तथाकथित पुरोगाम्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे गैर; मात्र तरीही कधी तरी या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे लक्ष द्यायला नको का ? अशा विकृतींकडे दुर्लक्ष करत राहिल्यावर त्या फोफावत रहातात आणि मग भारतात एखाद्या शहरातील रस्त्यावरील कुत्र्यावरही बलात्कार केल्याची बातमी वाचनात येते. सार्‍याच बलात्कारी विकृतींचे मूळ एक असते. या राक्षसी प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करणे घातक आहे !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.

(साभार : दैनिक ‘तरुण भारत’)